घरदेश-विदेशहिवाळी अधिवेशनाअगोदरच होणार खातेवाटप

हिवाळी अधिवेशनाअगोदरच होणार खातेवाटप

Subscribe

येत्या दोन दिवसात घोषणा होण्याची शक्यता

राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा नुकताच पूर्ण झाल्यानंतर आता खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून लांबणीवर गेलेल्या या खातेवाटपाला अखेर लवकरच मुहूर्त मिळाला असून आगामी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरच उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त मंत्रालयातील सूत्रांनी दिले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत खातेवाटप केले जाणार असून त्यानुसार मंत्रालयातील अधिकारी वर्गाच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत.

राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्कमध्ये मोठ्या दिमाखदार कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांचा समावेश आहे. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी शपथ घेतली होती.

- Advertisement -

या सहा मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर मंत्रालयातील त्यांच्या दालनाचे वाटप देखील दोन दिवसांपूर्वीच करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप झालेले नसतानाही दालनाचे वाटप करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी पक्षांतील अनेकांचे लक्ष या खातेवाटपाकडे लागून राहिले होते. विशेष म्हणजे, कोणत्या पक्षाला गृहखाते मिळणार, याबाबत कमालीची उत्सुकला लागून राहिली आहे. त्याचबरोबर वित्त आणि इतर महत्त्वाची खाती कोणत्या पक्षाच्या वाटेला जातात यावरून तिन्ही पक्षांत काही दिवसांपूर्वी एकमत झाले नव्हते. त्यामुळे खातेवाटपाकडे सत्ताधारी पक्षांबरोबरच विरोधकांचे देखील लक्ष लागून राहिले होते. अखेर नव्या सरकारने यावर तोडगा काढल्याची माहिती समोर आली असून त्यानुसार खातेवाटप करण्यात येणार आहे.

दरम्यान, मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनापूर्वीच खातेवाटप जाहीर करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्व सचिवांबरोबर बैठक झाली होती. या बैठकीत काही सचिवांकडून खातेवाटपाबद्दल विचारणा करण्यात आली आहे. अधिवेशनादरम्यान खातेवाटप पूर्ण न झाल्यास विरोधकांकडून उपस्थित होणार्‍या प्रश्नांना उत्तरे कोण देणार? असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्याची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप अंतिम करण्याचे निश्चित केल्याचे कळते.

- Advertisement -

यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील चर्चा करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यामुळे येत्या दोन दिवसांत खातेवाटप पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याकडे कोणते खाते ठेवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.गृह, महसूल, नगर विकास आणि वित्त कोणत्या पक्षांच्या वाट्याला जाते, हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांच्या नजरा त्यावर लागून राहिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -