पूरग्रस्तांना ५०० घरं बांधून देणार- नाना पाटेकर

काळजी करू नका सगळं काही नीट होईल,आपण सगळे मिळून तुमचं दुःख दूर करु

kolhapur

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीतील अनेकांना या भयावह पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. यानंतर पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. यामध्ये स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह महाराष्ट्रातील अनेक लोकं पुढे सरसावून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंबरोबर आर्थिक सहाय्य देखील केले.

संवेदनशील नानांनी घेतली पूरग्रस्तांची भेट

याच पार्श्वभूमीवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आज कोल्हापुरमधल्या शिरोळमध्ये जाऊन भेट दिली. मनाने संवेदनशील असणारे नाना पाटेकर आज सांगलीतील ५ गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे. हे मदतकार्य करत असताना पद्माराजे विद्यालयात नाना पाटेकर यांनी काही पूरग्रस्तांची भेट घेतली. काळजी करु नका आपण सगळे सोबत आहोत सगळं काही नीट होणार, असे आश्वासन देत अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.

यासह, शिरोळमध्ये ५०० घरं बांधणार असल्याचं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले आहे. ”शासनाने काही निधी दिला आहे. बाकीचे पैसे आम्ही देतो आहे. मला यासाठी कोणतंही श्रेय नको जे काही करतोय ते आपण सगळे करतो आहोत”, असे यावेळी नाना पाटेकर यांनी सांगितले.

पाटेकरांनी दिला पूरग्रस्तांना दिलासा

राज्यभरातून कोल्हापूर आणि सांगलीसाठी मदत मिळताना दिसत आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने पुढे येत आहे. मराठी कलाकारांनंतर बिग बी अमिताभ यांनीही पूरग्रस्तांना मदतीचं आवाहन केल आहे. तर, अजिंक्य रहाणे आणि सचिन तेंडुलकरनेही पूरग्रस्तांना मदत देत मदतीचं आवाहन केल आहे. त्यानंतर आता अभिनेता आणि नाम या सामाजिक संस्थेचे प्रमुख नाना पाटेकर यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागांना भेट देऊन आता रडायचं नाही. सगळ्यांनी मिळून या संकटाला तोंड द्यायचं, अशा शब्दांत देखील पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.