भाजपच्या ब्लॅकमेलिंगमुळेच काँग्रेसनं आमच्याशी युती केली नाही – प्रकाश आंबेडकर

Mumbai
congress dis not make alliance because bjp is blackmainling congres leader
फाईल फोटो

काँग्रेससोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही युतीचं घोडं गंगेत न न्हाता कोरडं ठाक राहिल्यानंतर आता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. ‘भाजर आणि आरएसएसने काँग्रेसला ब्लॅकमेल केल्यामुळेच त्यांनी आमच्याशी युती केली नाही’, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अकोल्यामधील कार्यालयात गुरुवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.

शुक्रवारी राज्यातल्या सर्व ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार असल्याचं यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सांगितल्यानंतर काँग्रेससोबत न झालेल्या युतीसंदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारलं. यावेळी ‘काँग्रेसला आम्ही अनेकदा सांगून देखील त्यांनी ऐकलं नाही’, असं ते म्हणाले. ‘मला माहीत होतं की काँग्रेसच्या राज्यातल्या आणि देशातल्याही अनेक नेत्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमचं ब्लॅकमेलिंग होऊ शकतं. पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी तेच झालं’, असं त्यांनी सागितलं. तसेच, ‘शरद पवारानी माढ्यातून माघार घेणं, सुजय विखे पाटील भाजपमध्ये जाणं किंवा विजयसिंह मोहिते पाटील असतानाही रणजित सिंहांचं नाव पुढे येणं यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची काय परिस्थिती असेल, ते सहज लक्षात येईल’, असंही ते यावेळी म्हणाले.

‘नागपुरात काँग्रेसचा गडकरींना केकवॉक’

दरम्यान, ‘काँग्रेसने नागपूरमध्ये नाना पटोलेंना उमेदवारी देऊन नितीन गडकरींना एका अर्थाने केकवॉकच दिला आहे. नाना पटोलेंची उमेदवारी डमीच आहे असा माझा जाहीर आरोप आहे’, असं आंबेडकर म्हणाले. यासोबतच राजू शेट्टींना काँग्रेसनं नाकारणं यावरही त्यांनी टीका केली. ‘एकीकडे काँग्रेसकडे इतर पक्ष युतीसाठी तयार असताना काँग्रेस मात्र त्यांना नाकारत असेल, तर हे पक्ष त्यांचे त्यांचे मार्ग निवडणारच’, असं ते म्हणाले. ‘इतर पक्षांमधले बरेच असंतुष्ट माझ्या संपर्कात होते, मात्र आमच्या ४८ उमेदवारांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश नाही’, असंदेखील त्यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here