घरमहाराष्ट्रआजपासून राज्यात होणार आठवड्यातून चार दिवस कोरोना लसीकरण

आजपासून राज्यात होणार आठवड्यातून चार दिवस कोरोना लसीकरण

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा

देशभरासह राज्यात १६ जानेवारीपासून कोरोनावरील लसीकरण मोठ्या जोमात सुरू झाले. मात्र राज्यात ‘कोविन’ अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणीमुळे कोरोना लसीकरण स्थगित करण्यात आले होते. दरम्यान या ‘कोविन अ‍ॅप’ मधील तांत्रिक अडचण दूर झाल्या असून राज्यात आजपासून पुन्हा लसीकरणाला नव्या जोमाने सुरुवात करण्यात येणार आहे. यानुसार, राज्यात आठवड्यातून चार दिवसच लसीकरण होणार असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी हे चार दिवस लसीकरणासाठी असून या होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

एका केंद्रावर दिवसाला १०० कर्मचाऱ्यांना लस

वर्षा येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी लसीकरणाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. शनिवारी शुभारंभ प्रसंगी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंत्रणेचे कौतुक केले. लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन अॅपबद्दल मुख्यमंत्र्यांनी या वेळी माहिती घेतली. राज्यातील लसीकरण केंद्रांवर दिवसभरात १०० पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलविण्यात येणार असून लसीकरणामध्ये दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रोगप्रतिकारक क्षमता तयार होते. त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधासाठी जे नियम आहेत त्याचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुंबईत १० केंद्रांवर यंत्रणा सज्ज

मुंबईत १० केंद्रांवर यंत्रणा सज्ज असून नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल; केईएम रुग्णालय, परळ; शीव रुग्णालय; कूपर रुग्णालय, विले पार्ले; व्ही.एन. देसाई रुग्णालय, विलेपार्ले; वांद्रे भाभा रुग्णालय; डॉ. आंबेडकर शताब्दी रुग्णालय, कांदिवली; राजावाडी रुग्णालय, घाटकोपर; बीकेसी कोविड सेंटरवर एकूण ४० बूथवर लसीकरण होणार आहे. तर राज्य सरकारच्या माध्यमातून जे.जे. रुग्णालयात एका बूथवर लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -