घरमहाराष्ट्र'कोरोनाचं संकट दूर होऊ दे'; अजित पवारांचं विठुराया चरणी साकडं

‘कोरोनाचं संकट दूर होऊ दे’; अजित पवारांचं विठुराया चरणी साकडं

Subscribe

अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गुरुवारी विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. दरम्यान, विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवळी मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयरही उपस्थित होते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांची उपस्थितीत होती.

पंढरीच्या विठुराया चरणी वंदन करताना अजित पवार यांनी कोरोनावर मात करण्यासाठी लवकर लस येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे घातले. “अवघ्या जगासमोर कोरोनाचे संकट आहे. आपण या संकटाला सामोरे जात आहोत. मधल्या काही काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे पाहायला मिळाले. पण पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा काही बंधने पाळणे, खबरदारी घेणे गरजेचे आहे,” असे आवाहन अजित पवार यांनी जनतेला केले. तसेच आषाढी वारीप्रमाणे कार्तिकी वारीलाही सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल अजितदादांनी वारकरी संप्रदायाचे आभार मानले. यंदा राज्यातील जनतेच्या वतीने आपल्याला विठ्ठलाची पूजा करण्याचे भाग्य लाभले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिकी वारी परंपरेनुसारच होईल, असा विश्वासही अजितदादांनी यावेळी व्यक्त केला. पुढे अजित पवार यांनी “राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टीने संकटात आला आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुख: हलके करण्याची ताकद शासनाला दे अशी मागणी विठ्ठलाकडे केली.”

- Advertisement -

कोरोनाला आळा घालायचा असेल तर सर्वकाही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. सरकारने घालून दिलेले सर्व नियम लोकांनी काटेकोरपणे पाळावे असे आवाहनही पवार यांनी केले. दरम्यान, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करुन त्यांनी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वंदन केले. त्याचबरोबर त्यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -