आमच्या दैवताबद्दल काहीही बोलले तर ऐकून घेणार नाही

अ‍ॅड. अनिल परब यांची प्रतिक्रिया

आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, कोणीही आमच्या दैवताबद्दल काहीही बोलले तर आम्ही ऐकून घेणार नाही, असे म्हणत परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. मर्यादा दोन्ही बाजूंनी पाळाव्यात. कोणी काही बोलले, दैवताला बोलले असेल आणि सत्तेत बसलोय म्हणून आम्ही बोलायचे नाही का? बाळासाहेबांनी हे शिकवले नाही. नौसेना अधिकारी आहे म्हणून संयम तोडण्याचा अधिकार कुणी दिला? शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती ही, असे म्हणत अनिल परब यांनी नौदल प्रमुखांवरील हल्ल्याचे अप्रत्यक्ष समर्थन केले.

बेकायदेशीर कामे करणार्‍यांना राज्यपाल भेटत असतील तर फक्त कंगनाला का भेटता? बेकायदा बांधकामे तुटलेल्या सामान्य लोकांनाही भेटावे. तिचे बांधकाम तुटल्यावर इतका पोटशूळ, असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यपालांना विचारला. कंगना रानौतने तिच्या कार्यालयाच्या बांधकाम पाडण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावरुन अनिल परब यांनी कंगना आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडले.

कंगनाला जर मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल, तर तिने योग्य वाटत असेल तिथे राहावे. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल तर आम्ही ऐकून घेणार नाही. आपले बस्तान त्यांनी उचलावे हेच योग्य ठरेल, असे म्हणत अनिल परब यांनी कंगनाला महाराष्ट्राबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

त्यांना जर मुंबई पीओके वाटत असेल, तर शिवसेनेने भूमिका घेतली आहे. त्यांना जिथे योग्य वाटते तिथे राहावे. पण, मुंबईबाबत कोणी वाईट बोलत असेल, तर ते ऐकून घेऊ शकत नाही. हा अपमान मुंबईवर प्रेम करणार्‍यांवर आहे. मुंबई पीओके असेल तर त्यांनी आपले बस्तान इथून हलवावे. महापालिकेने बेकायदेशीर कामावर कारवाई केली, त्यांना राज्यपाल वेळ देत असतील, तर असेच इतरांनाही राज्यपाल भेटले पाहिजे, विचारपूस केली पाहिजे, अशी टीका अनिल परब यांनी केली.

कंगना रानौत स्प्लिट पर्सनॅलिटी आहे असे म्हणतात. तिला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे, डॉक्टर नाही भेटले तर शिवसेना मदत करेल. शिवसेना कंगनाला काही बंदी घालणार नाही ती महत्त्वाची नाही. अशा अनेक कंगना आल्या आणि गेल्या, असा खोचक टोलाही अनिल परब यांनी लगावला.

चीनच्या हेरगिरीबाबत केंद्राने विचार करावा, परंतु त्यांचे लक्ष प्रत्येक राज्यात सत्ता आणण्याचे आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

ठाकरे ब्रॅण्डला पर्याय नाही, राज्यात त्याला विरोधकांकडून धक्का लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण हा ब्रॅण्ड भक्कम आहे. त्यांचे नाव ठाकरे असल्याने साद घातली. शिवसेनेची पाळेमुळे उखडता येणार नाहीत, कुणाला आमदार असूनही सीएम होता आले नाही. याचे नैराश्य आहे त्यांचे. त्यामुळे राज्याची बदनामी केली जात आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे ब्रँड कोणीही संपवू शकत नाही. अनेकांकडून प्रयत्न केले गेले आहेत. त्यांनी काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आम्ही एकटे लढत आहोत. सेनेने वाईट काळ बघितला आहे. प्रत्येकाला स्वतःचा विचार आहे. आपला निर्णय घ्यायला प्रत्येक जण स्वतंत्र आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.