ठाकरे फार्म हाऊसची सुरक्षा वाढवली, गूढ मात्र कायम!

ठाकरे फार्म हाऊस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तालुक्यातील भिलवले येथील फार्म हाऊसची सुरक्षा वाढविण्यात आली असून, दोन दिवसांपूर्वी फार्म हाऊसवर दादागिरी करणारे दोन पत्रकार आणि चालक यांची कसून चौकशी सुरू असल्याने प्रकरणाचे गूढ मात्र कायम आहे.

मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास निळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तीन इसमांनी ठाकरे फार्म हाऊस कुठे आहे, याची चौकशी केली होती. सुरक्षा रक्षकाला तिघांचा संशय आला होता. त्याने माहीत नाही, असे उत्तर दिले होते. त्यानंतर तिघांनी जबरदस्तीने आत प्रवेश करीत सुरक्षा रक्षकाला अश्लील शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून तेथून पलायन केले होते. घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी तपासचक्रे वेगात फिरवत सर्वत्र नाकाबंदीचे आदेश दिले होते.

दाऊदकडून मातोश्री उडविण्याच्या आलेल्या धमकीमुळे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) देखील सक्रिय होऊन त्याच रात्री नवी मुंबईत संशयित कारसह तिघांना ताब्यात घेतले होते. तिघांवर गुन्हा दाखल करून 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत. स्टिंग ऑपरेशन की अन्य काही हेतूने हे तिघे आल्याचे स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी तिघांजवळून जप्त केलेल्या कारमध्ये काही संशयास्पद सापडले का, याबाबत तपासाचा भाग असल्याने निश्चित माहिती मिळालेली नाही. त्यामुळे पोलीस हे प्रकरण अतिशय काळजीपूर्वक हाताळत असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. यातून कोणती माहिती बाहेर येते, याबाबतची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे.