लॉकडाऊनमध्येही नफ्यातली इंडस्ट्री, कमावतेय घरबसेल्यांकडूनच

Mumbai
online gaming industry
ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारताने आता सेल्फ आयसोलेशन मोडमध्ये जात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. पण आता घरबसल्या वेळ घालवण्यासाठी लोक आता वेगवेगळ्या शकला लढवत आहेत. करोनातली संधी म्हणूनच अनेक प्रयोग सध्या होत आहेत. अनेक उद्योगांना याचा फटका बसला आहे. पण एक उद्योग मात्र करोनातही फायद्यात आहे. तो म्हणजे ऑनलाईन गेमिंगचा. करोनाच्या कालावधीत होम क्वारंटाईन केलेल्या भारतीयांनी आता ऑनलाईन गेमिंगला पसंती दिली आहे. दिवसातील अनेक तास सध्या ऑनलाईन गेमिंगमध्ये घालवण्यात येत आहेत.

घरबसल्या सध्या अनेक तास वेळ घालवताना लोकांना कंटाळा आलाय. पण ऑनलाईन गेमिंगमुळे घरबसल्याही तासन तास व्यस्त राहण्याचा एक पर्याय मिळाला आहे. ऑनलाईन गेम्सच्या डाऊनलोडमध्येही मोठ्या संख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळाल आहे. करोनामुळे अल्पावधीतच ऑनलाईन गेमिंगमध्ये १० ते १२ टक्के इतकी वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. पोकर दंगल या एका गेमसाठी दरदिवशी सरासरी ५ हजार युजर्स या गेमिंगसाठी सहभागी होत होते. मात्र ही संख्या आता ६५०० इतकी वाढली आहे. सरासरी अडीच तास ऑनलाईन गेमिंगसाठी लोक वेळ द्यायचे. पण हाच वेळ आता ४ ते ५ तास इतका सरासरी वाढलेला आहे. येत्या दिवसांमध्ये यामध्ये आणखी वाढ होईल असा ऑनलाईन गेमिंग कंपन्यांचा दावा आहे.

ऑनलाईन गेम्समध्ये स्पेस वॉरियर, बबल शूटर यासारख्या गेममध्ये लोक वेळ घातवताना पैसेही मोजतात. तसेच अड्डा ५२ रमी, तीन पत्ती यासारखे गेम्सदेखील मोठ्या प्रमाणात डाऊनलोड होत आहेत. या गेम्स खेळणाऱ्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ऑनलाईन सरासरी गेम्स खेळणाऱ्यांच्या आकडेवारीच्या तुलनेत सध्या करोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक हे गेम्स तासन तास खेळत आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरीस तीन पटीने ऑनलाईन गेमिंगमध्ये वाढ होत, ३० टक्क्यांनी युजर्स वाढले. भारतासोबतच देशाबाहेरही ऑनलाईन गेमिंग करणाऱ्यांचा आकडा खूप मोठा आहे. भारतीय गेमिंग कंपन्याही या वाढत्या युजर्सच्या चॅलेंजसाठी तयार आहेत. तसेच अधिकाधिक युजर्स आकर्षित व्हावेत म्हणून या कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत.