कोरोना रिपोर्ट नाही म्हणून आमदार ताटकळत उभे; अजितदादांनी फैलावर घेतल्यावर मिळाला प्रवेश

Maharashtra Vidhan Bhavan 1200
महाराष्ट्र राज्य विधीमंडळ, मुंबई

महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात अधिवेशन होत असल्यामुळे यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधीमंडळ कर्मचारी, आमदार, त्यांचे पीए, सुरक्षा कर्मचारी आणि पत्रकार यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र रिपोर्ट वेळेवर न मिळाल्यामुळे अनेकांना गेटवर ताटकळत उभे राहावे लागले. यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांचा देखील समावेश होता. रिपोर्ट वेळेवर न मिळाल्यामुळे आमदारांना गेटवरच अडविण्यात आले होते. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार आल्यानंतर आमदारांनी त्यांच्यासमोर अडचण मांडली. अजित पवारांनी देखील आपल्या शैलीत लगेचच प्रशासनावर फैलावर घेत आमदारांना विधीमंडळात प्रवेश मिळवून दिला.

सोमवारी विधीमंडळाचे अधिवेशनात सकाळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली. सकाळी ११ वाजता विधानसभेची बैठक सुरु होणार होती. मात्र गेटवर अनेकांचे कोरोना चाचणीचे रिपोर्टच न पोहोचल्यामुळे आमदारांना अडविण्यात आले होते. अजित पवार विधीमंडळ परिसरात पोहोचताच आमदारांनी दादांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. दादांनीही आपल्या शैलीत प्रशासनाला जाब विचारला. विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना देखील तातडीने बोलावून घेण्यात आले. आमदारांचे रिपोर्ट तातडीने गेटवरील काऊंटवर आणा, असे आदेश अजित पवार यांनी दिले. त्यानंतर निगेटिव्ह असलेल्या आमदारांना आतमध्ये सोडण्यास सुरुवात झाली.

हे वाचा – विधिमंडळ पावसाळी अधिवेशन : मुख्यमंत्री दाखल होताच भाजप आमदारांची घोषणाबाजी