दादरच्या भाजी मार्केटमध्ये ‘शॉपिंग डिस्टंन्सिंग’

Mumbai
dadar marketa
दादर भाजी मार्केट

संपूर्ण देशांत १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे मुंबईकरांच्या मनात भीतीचे काहूर माजू लागले आहे. त्यामुळे मुंबईतील किराणा माल आणि भाजीपाला खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी केली जात आहे. मुंबईतील दादरमध्ये भाजीपाल्याचा सर्वात घाऊक बाजार भरला जात असल्याने याठिकाणी भाजीविक्रेते मोठ्याप्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे येथील गर्दी नियंत्रणात आणून विक्रेत आणि खरेदीदारांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्यादृष्टीकोनातून महापालिका अधिकारी व पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष रचना करण्यात आली आहे. प्रत्येक भाजी विक्रेत्याला दोन फुटांच्या अंतरावर बसून हे सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

देशांत लॉकडाऊन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठ्याप्रमाणात लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली. त्यामध्ये दादरमधील भाजीमार्केटमध्ये घाऊक व्यापारी आणि किरकोळ खरेदीदारांनी मोठी गर्दी केली होती. ज्यामुळे मोठ्या्प्रमाणात भीती व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर दादरमधील जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आणि स्थानिक वरिष्ठ पोलिस निरिक्षक आदींच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवत त्यांच्या सुरक्षित अंतर राखण्याच्यादृष्टीकोनात योजना आखली गेली. त्यानुसार प्रत्येक शेतकरी तथा भाजी व्यापाऱ्याला २ फुटांच्या अंतरावर बसवताना, खरेदीदाराला एक मीटर अंतरावर उभे करत त्याची विक्री करण्याच्या माध्यमातून पट्टे मारत जागा  निश्चित करण्यात आली आहे.

दादरमधील सेनापती बापट मार्गावरील केशवसुत उड्डाणपुलाखाली परिसरापर्यंत भाजीपाला विक्रीसाठी घाऊक विक्रेते बसतात. राज्याच्या अनेक भागामध्ये शेतकरी याठिकाणी येतात. तब्बल २०० ट्रक भरुन भाजीपाला याठिकाणी विक्रीसाठी आणला जातो. तर या घाऊक विक्रेत्यांकडून खरेदी करण्यासाठी सुमारे एक हजारहून भाजी विक्रेते याठिकाणी येत असतात. छोटे व मोठे टेम्पो तसेच टॅक्सीतून ही भाजी नेण्यासाठी हे भाजीविक्रेते याठिकाणी येत असतात. पहाटे चार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हा बाजार भरला जातो. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्याचा हा प्रायोगिक तत्वावरील प्रयत्न असल्याचे जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here