मोदी, शहा देशातील जनतेची दिशाभूल करताहेत

बैठकीला तृणमूल, बसप, आप, शिवसेना गैरहजर

Mumbai
sonia gandhi
सोनिया गांधी

केंद्रातील भाजप सरकारविरोधात रणनीती तयार करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी विरोधी पक्ष नेत्यांची सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला २० पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाचा आणि आम आदमी पक्षाचा कोणताही नेता उपस्थित नसल्यामुळे विरोधकांचे ऐक्य पुन्हा फसल्याची चर्चा होती. या बैठकीत सोनिया गांधी यांनी सीएए आणि एनआरसी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांविरोधात जोरदार टीका केली.

मोदी आणि शहा हे देशातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी यावेळी केला. सोमवारी झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात सीएए विरोधात आंदोलन, काही विद्यापीठांमध्ये झालेला हिंसाचार आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती, देशातील आर्थिक मंदी यांसारख्या मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्रातील नेतृत्वाला लक्ष्य केले. मोदी-शहा यांच्याकडून आक्षेपार्ह विधाने करण्यात आली असून त्यांनी असे करणे कायम ठेवले आहे.

केंद्र सरकार संविधानाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. याविरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. सीएए आणि एनआरसी हे तत्कालिक कारण आहे. परंतु, यामुळे व्यापक नैराश्य आले आहे. लोकांमध्ये प्रचंड राग आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांची वागणूक ही पक्षपाती आणि क्रूर होती, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

सरकारकडून लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात आहे. लोकांचे सांप्रदायिकतेच्या आधारावर विभाजन केले जात आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे देशातील लोकांची दिशाभूल करीत आहेत. या दोन्ही नेत्यांनी काही आठवड्यापूर्वी केलेल्या स्वतःच्या विधानाचे त्यांनीच खंडन केले आहे, असे सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीला २० पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, ए. के. अँटनी, के. सी. वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद, रणदीप सुरजेवाला, सीताराम येचुरी, डी. राजा, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राजदचे मनोज झा, अजित सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवसेना गैरहजर
सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला शिवसेनेचा नेता देखील उपस्थित राहणार का, अशी चर्चा देशभरात होती. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेना या बैठकीला उपस्थित राहील असे मानले जात होते. मात्र बैठकीला शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. राज्यात काँग्रेससोबत आम्ही सत्तेत असलो तरी अद्याप युपीएमध्ये सहभागी झालेलो नाहीत, असे शिवसेनेकडून मागेच स्पष्ट करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here