घरताज्या घडामोडीचक्रीवादळाच्या आपत्तीवर मुंबई मात करेल- इकबालसिंह चहल

चक्रीवादळाच्या आपत्तीवर मुंबई मात करेल- इकबालसिंह चहल

Subscribe

नौदल, तटरक्षक दल, पोलीस, रेल्वे, हवामान खाते, विविध संस्था यांच्यासमवेत समन्वय साधून सोमवारपासूनच तात्काळ कामे सुरु करण्यात आली असल्याने मुंबई महापालिकेची  यंत्रणा एकदिलाने या आपत्तीवर मात करेल,

मान्सूनपूर्व उपाययोजनांमध्ये चक्रीवादाळसंबंधातील बहुतांशी कामे समाविष्ट असल्याने ती यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत. तसेच चक्रीवादळाची संभाव्यता लक्षात घेऊन या कामांचा वेग आता आणखी वाढविण्यात आला आहे. नौदल, तटरक्षक दल, पोलीस, रेल्वे, हवामान खाते, विविध संस्था यांच्यासमवेत समन्वय साधून सोमवारपासूनच तात्काळ कामे सुरु करण्यात आली असल्याने मुंबई महापालिकेची  यंत्रणा एकदिलाने या आपत्तीवर मात करेल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर बुधवारी ३ जून २०२० रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असून सर्व उपाययोजना सर्वांच्या समन्वयाने करण्यात येत आहेत. या अनुषंगाने पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त चहल यांच्यासह सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त, संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त व इतर संबंधित खातेप्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी दुपारी आढावा बैठक घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी ही ग्वाही दिली.

- Advertisement -

अनेक वर्षानंतर प्रथमच मुंबईवर चक्रीवादळाचे संकट येण्याची शक्यता आहे. संभाव्य चक्रीवादळासोबत जोरदार पावसाची आणि पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन मी स्वतः आणि सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी संपूर्ण स्थितीवर व उपाययोजनांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आपत्ती व्यवस्थापनाच्या निश्चित पद्धतीनुसार, सखल भागातील, संभाव्य दरड कोसळण्याच्या परिसरातील अथवा पावसाचे पाणी शिरण्याच्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी उपसा करणारे पंप लावण्यात आले आहेत. बांधकाम सुरू असलेल्या उंच इमारतींवरील क्रेन सुरक्षित करण्यासाठी सर्व संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. विविध चौपाट्यांवर जीवरक्षक तैनात करण्यात आले असून पूर स्थितीमध्ये मदतकार्यासाठी उपयोगी अशा रेस्क्यू बोट, जेट स्‍की यांच्यासारखी साधने देखील तैनात आहेत. वादळामुळे झाडे अथवा झाडांच्या फांद्या कोसळल्यास त्या तातडीने उचलण्यासाठी कर्मचारी नेमले आहेत. या संभाव्य संकटाच्या काळात कोणताही धोका पत्करायचा नाही, अशी सक्त सूचना देऊन विभाग कार्यालयांनी आपल्या स्तरावर देखील तातडीची बैठक घेऊन नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड १९ अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करीत असतानाच मुंबईवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. एकामागोमाग संकटे येत असली तरी अशी अनेक संकटे मुंबईकरांनी झेलली असून त्याचा आत्मविश्वासाने सामना केला आहे. संभाव्य ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले तरी एकमेकांच्या सहकार्याने व झोकून देऊन या काळात काम करू या आणि जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ या, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. ते म्हणाले की, चक्रीवादळापूर्वी, प्रत्यक्ष चक्रीवादळाच्या काळात आणि त्याच्या पश्चात अशा तीन टप्प्यांमध्ये विभागणी करुन विविध नागरी कामे करावीत, जेणेकरुन त्यामध्ये सुसूत्रता असेल.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊन निमित्त पोलिसांनी बंदोबस्तासाठी ठिकाणी तंबू उभारून चौक्या बनवल्या असून त्याबाबत पोलिसांशी समन्वय साधून त्या सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. मिठी नदी सभोवतालचा परिसर, आरे वसाहत यासह ठिकठिकाणच्या झोपडपट्टी भागांमध्ये जेथे घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, तेथेदेखील योग्य उपाययोजना कराव्यात, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -