घरमहाराष्ट्रनाशिकअंमली पदार्थांची वाहतूक; गुन्हेगारी टोळ्यांचा कमाईचा मार्ग

अंमली पदार्थांची वाहतूक; गुन्हेगारी टोळ्यांचा कमाईचा मार्ग

Subscribe

वाट नशेची - प्रोटेक्शन देत केली जाते वाहतूक, सरकारी यंत्रणांनाही केले जाते 'मॅनेज'

गुन्हेगारी जगवण्यासाठी विद्यार्थ्यांसह महिलांना नशेच्या जाळ्यात ओढायचं आणि पैसा कमवायचा गुन्हेगारी टोळ्यांचा उद्योग चांगलाच तेजीत आहे. थेट नाशिकपर्यंत रुंदावलेल्या उद्योगाच्या कक्षेत मुंबई-आग्रा महामार्ग आणि मुंबई-मनमाड-नरडाणा या रेल्वे मार्गांवरील लहान-लहान गावंदेखील ओढली जात आहेत. त्यातून गुन्हेगारांच्या हाती प्रचंड पैसा येतो आहे. या टोळ्यांकडून ऑडी ते जॅग्वार यांसारख्या ३० ते ८० लाख रुपये किंमतीच्या वाहनांचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर होतो. यावरुन त्यांच्या उद्योगाची उलाढाल किती प्रचंड असेल हे सहजपणे लक्षात येते.

एखादा गुन्हा करताना जेवढी जोखीम असते किंवा त्यातून जी कमाई होणार असते, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक पैसा नशेच्या बाजारातून मिळतो. विशेष म्हणजे भारतातील अंमली पदार्थविरोधी कायद्यांमधील पळवाटा, तपास यंत्रणांमधील मॅनेज होणारे अधिकारी आणि राजकीय आशीर्वाद यामुळे जोखीम फारशी राहत नाही. म्हणूनच अलिकडे मुंबई-मध्य प्रदेश आणि मुंबई-गुजरात आणि मुंबई-आग्रा या वाटांवरुन चरस, गांजासह नशेसाठीच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते.

- Advertisement -

३ रुपयांची गोळी ५० रुपयांना विक्री

मालेगावात कुत्ता गोली अर्थात अल्फ्रोझोलम गोळ्यांचा जो साठा सापडला, त्यातील गोळ्या काळ्या बाजारात प्रत्येकी ५० रुपयांपर्यंत विकल्या जात होत्या. डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असल्यास १५ गोळ्यांची अल्फ्रोझोलमची स्ट्रीप मेडिकलमध्ये ४५ रुपयांना मिळते. मात्र, या गोळ्यांचे व्यसन लागलेल्या व्यक्तींना हीच तीन रुपयांची एक गोळी १० ते ५० रुपयांपर्यंत विकली जाते. नशेसाठीच्या गोळ्या, गांजा, चरस, इफेड्रीन याबाबतदेखील अशीच परिस्थिती आहे. गुन्हेगारांचा हा धंदा कोट्यवधींच्या घरात आहे.

नाशिकमध्ये पकडली होती जॅग्वार

एमडी या अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करत नाशिक पोलिसांनी गेल्या वर्षी कारखानाच उद्ध्वस्त केला होता. रणजित मोरे, पंकज दुंडे व नितीन माळशेदे या तिघांकडे या व्यापारासाठी ८० लाख किंमतीची जॅग्वार गाडीही होती. गाडीमधून पोलिसांनी १५ लाखांचे एमडीही जप्त केले होते. या प्रकरणाचे धागेदोरे थेट मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्सपर्यंत गेले होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -