घरमहाराष्ट्रनाशिकमंगळवारपासून जिल्हाभरात दुय्यम निबंधक कार्यालयांत बेमुदत लेखणीबंद

मंगळवारपासून जिल्हाभरात दुय्यम निबंधक कार्यालयांत बेमुदत लेखणीबंद

Subscribe

मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होणार, प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेने उचलले आंदोलनाचे पाऊल

महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेनं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्यापासनं लेखनी बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मागण्यांबाबत शासनाला वारंवार निवेदने देऊनही लक्ष दिले जात नसल्याच्या निषेधार्थ संघटनेनं थेट आंदोलनाचं पाऊल उचललंय. जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांतल्या दुय्यम निबंधक कार्यालयात १ ऑक्टोबरपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनामुळे जिल्हाभरातलं काम ठप्प होणार असून, दस्त नोंदणीसाठी नागरिकांनी न येण्याचं आवाहन संघटनेनं केलंय.

महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने मांडलेल्या अनेक मागण्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जात असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन खोत, कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण, सचिव सागर पवार यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. लेखणीबंद आंदोलनामुळे जिल्हाभरातील कामकाज ठप्प होणार असून, दस्त नोंदणीसाठी नागरिकांनी येऊ नये, असे आवाहनही संघटनेने केले आहे.

- Advertisement -

सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तत्काळ कराव्यात, कोरोना महामारीमुळे मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी ३० टक्के उपस्थितीचे आदेश असताना १०० टक्के उपस्थितीत काम करत आहेत. मात्र, विभागातील कर्मचार्‍यांसाठी मागणी करुनही जीवन सुरक्षा विमा कवच लागू केलेले नाही. कोरोनामुळे आतापर्यंत ६ अधिकारी व कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. तुकडेबंदी कायद्याने होणार्‍या कारवाया, रेरा कायद्यात होणारी कार्यवाही, सहदुय्यम निबंधक वर्ग-२ व दुय्यम निबंधक श्रेणी-१ संवर्गाचे एकत्रीकरण व्हावे, हार्डवेअर इ. साहित्य मिळावे, ई-सरिता, ई-मुटेशन, ग्रास व आधार सर्व्हरबाबतच्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. यासह शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने बेमुदत लेखणीबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

प्रलंबित मागण्यांबाबत शासनाला जाग यावी यासाठी बेमुदत लेखणीबंद आंदोलन करत आहोत. यामुळे दस्त नोंदणीसह कार्यालयात कोणतेही कामकाज होणार नाही. नागरिकांनी संघटनेला सहकार्य करावे.

– ई. डी. देवशी, दुय्यम निबंधक, इगतपुरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -