मोफत पार्किंग : पालिकेच्या शहरातील मॉल्सला नोटीसा

मॉल, व्यावसायिक इमारतीमधील पार्किंग मोफत करण्याचा निर्णय महासभेत महापौरांनी घेऊनही अंमलबजावणी नाही

Nashik
Car Parking
प्रातिनिधीक फोटो

मॉलमध्ये पार्किंगसाठी वाहनचालकांडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी करणार्‍या मॉल्सला महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. मॉल, व्यावसायिक इमारतीमधील पार्किंग मोफत करण्याचा निर्णय महासभेत महापौरांनी घेतला होता. त्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी नगररचना विभागाला दिले होते.

नगररचना विभागाने सिटी सेंटर, बिग बझार आदी मॉल्सचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीसमध्ये म्हटले आहे की, मॉल्सला वाहनतळाचे क्षेत्र चटई क्षेत्र निर्देशांक विरहित मंजूर केलेले आहे. त्यामुळे या जागी वाहने उभी करताना कोणतेही शुल्क वाहनचालकांकडून घेतले जावू नये , मनपाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर, कायदेशीर कारवाईचा इशारा नगररचना विभागाने दिला आहे. नुकताच झालेल्या महासभेत महापौर रंजना भानसी यांनी पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक शहरातील सर्व मॉलमधील,व्यावसायिक इमारतीतील पार्किंग खुल्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नगररचना विभागाला करण्याचे निर्देश दिले होते. नगरचना विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र आहेर यांनी मॉलचालकांना नोटिसा बजावत निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली आहे. शहरातील मॉलमध्ये नागरिकांना वाहने पार्किग करता येणार असल्याने, यामुळे मार्गावरील पार्किंग समस्या काही प्रमाणात कमी होईल, अशी चर्चा आज शहरात सुरु होती.

मॉलमधील पार्किंगमध्ये सशुल्क आकारणी होत असल्याचे गत महासभेत शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी प्रस्तावाद्वारे दिला होता. नगरसेवकांनीही या संदर्भात तक्रारी केलेल्या होत्या. या पार्किंग खुल्या करून देण्यात याव्यात व बेकायदेशीर पार्किंग शुल्क वसूल करणार्‍या मॉल्स विरोधात कारवाई करावी, असा ठराव मंजूर महापालिकेत करण्यात आला होता.