संकट काळात इतरांच्या उपयोगी पडणे हाच खरा मानवता धर्म

खासदार हेमंत गोडसे यांचे प्रतिपादन

corona shibir

नागरिकांनी कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात स्वत:च्या सुरक्षेबरोबरच शिस्तही पाळली पाहिजे. त्याचबरोबरच सामाजिक संस्थांसह सर्वच घटकांनी एकत्रित येऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे आवश्यक आहे.संकट काळात इतरांच्या उपयोगी पडणे हाच खरा मानवता धर्म असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे विविध पर्याय विचारात होते. यामध्ये मालेगावच्या डॉक्‍टरांनी पुढाकार घेऊन थेट शहरात येऊन तपासणी सुरू केली आहे. शहरातील राहत फाउंडेशनकडून भारतनगर भागात शहरातील नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती काढण्यासाठी तसेच,प्राथमिक उपचारासाठी सोमवारपासून आरोग्य शिबिर सुरु करण्यात आले.यावेळी खासदार हेमंत गोडसे बोलत होते.यावेळी जेष्ठ डॉकटर डॉ.रफिक शेख,डॉ.काशिफ शेख,माजी सरकारी वकील अॅड.एम.टी.क्यु सय्यद,अॅड.अन्सार सय्यद,नाजिम खान राजे,राहत फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड.नाजिम काजी,सचिव आसिफ शेख सर, नदीम शेख सर,तौफिक हाजी,आसिफ सय्यद,शोहेब शेख,नईम शेख,सोहेल काझी,माजिद पठाण आदी उपस्थित होते.

खासदार गोडसे पुढे म्हणाले की, शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.तसेच, विदेशात आजाराविषयी खूप जागरुक्ता आहे. विदेशात खूप कमी व्यक्ती आजारी पडतात. देशात व विदेशात आजाराविषयी फरक जाणवतो. विदेशात व्यक्तीला आजार नसेल तरी नियमीत आरोग्याची तपासणी केली जाते. मात्र आपल्याकडे आजारी पडलो तरी दवाखाण्यात जात नाही व आरोग्याची तपासणी करीत नाही. त्यामुळे आजाराचे प्रमाण आपल्याकडे वाढलेले आहेत. यावर मात करण्यासाठी आरोग्याची नियमीत तपासणी करावी, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. डॉ.रफिक शेख यांनी बोलतांना सांगितले की, शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढली असून परिस्थिती चिंताजनक होत आहे.या स्थितीत प्रत्येकाने जागृत राहून स्वरक्षणासोबत समाज रक्षण, परिवार रक्षण व आपल्या परिसराचे संरक्षण करण्यासाठी तपासणी करून घ्यावी. व विशेषत: आरोग्य विभागाने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे त्यातूनच आपण कोरोनावर विजय मिळविणार आहोत असे त्यांनी सांगितलं.

विविध तपासण्यांची सुविधा

या शिबिरात ऑक्‍सिमीटर, शरीराचे तापमान, एक्‍स- रे,रक्त तपासणी आदी सर्व बारीक तपासण्यांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सोमवारी अनेक रुग्णांच्या रक्त तपासण्या व एक्स रे काढण्यात आले.