वागडर्दी धरण ओव्हर फ्लो; तरी मनमाडकर तहानलेलेच

संघर्ष संपेना : पाण्यासाठी महिलांची पायपीट कायम

Manmad_Wagdardi_Dam

जुनेद शेख, मनमाड

मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण यंदाच्या समाधानकारक पावसामुळे भरले असले तरीही, मनमाडकरांच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ मात्र आजही संपलेला नाही. धरणाच्या सांडव्यावरून धो-धो पाणी वाहत असताना, मनमाडकरांना मात्र आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. भर पावसाळ्यात मनमाड शहरात तब्बल १३ ते १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन, भारतीय अन्न महामंडळाचे आशिया खंडातील क्रमांक दोनचे धान्य साठवणूक करणारे गोडाऊन, विविध ऑईल कंपन्यांचे प्रकल्प, रेल्वे ब्रिजनिर्मितीसाठीचे साहित्य तयार करणारा ब्रिटीशकालीन कारखाना अशी ओळख असलेल्या मनमाडची दुष्काळी शहर अशीही ओळख आहे. गेल्या 35 वर्षांपासून हा प्रश्न कायम आहे. ऋतू कोणताही असला तरीही, मनमाड शहराला कधी 15 ते कधी 20 दिवसांआड पाणीपुरवठा होतो. जिल्हाभरात सर्वत्र समाधानकारक पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हर फ्लो झाले आहे. सलग दुसर्‍या वर्षी धरण भरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे निदान आतातरी आपली पाणीटंचाईतून सुटका होईल, असे नागरिकांना वाटत होते. मात्र, पाणीटंचाईचा ससेमिरा काही संपत नाही. धरणात पाण्याचा मुबलक साठा असतानादेखील पालिका प्रशासनाकडून महिन्यातून दोन वेळाच पाणीपुरवठा केला जात असल्याने या परिस्थितीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

आम्ही 35 वर्षांपासून पाणीटंचाईला तोंड देत आहोत. धरणात मुबलक पाणी असतानाही आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही. राज्यात मनमाड नगर परिषद ही एकमेव अशी पालिका असेल, जी धरणात पाणी असतानाही नागरिकांना देत नाही. हा अन्याय असून याला सर्वस्वी पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे.
– रेखा येणारे, गृहिणी, मनमाड

ज्या दिवशी पाणी येते त्यादिवशी सर्व कामे बाजूला ठेवून संपूर्ण दिवस पाण्यासाठी द्यावा लागतो. त्या दिवशी जर एखाद्या कार्यक्रमाला बाहेर जायचे असेल तर अशावेळी परतल्यानंतर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. माझी सासू या घरात सून म्हणून आली, तेव्हाही हा पाणीप्रश्न कायम होता आणि आज मी सून म्हणून आली, तरीही हीच परिस्थिती आहे. कदाचित माझी सून येईल तेव्हाही हीच परिस्थिती कायम असेल.
– पूनम येणारे, गृहिणी, मनमाड