ऐन सणासुदीत व्यापाऱ्यांना नोटीसा; संतापाची लाट

नाशिकमधील वाहतुकीच्या खोळंब्याकडे पोलिसांनी केला अंगुलीनिर्देश; सोमवारी न्यायालयात हजर राहावे लागणार

NASHIK
MainRoad
ऐन सणासुदीत व्यापाऱ्यांना नोटीसा; संतापाची लाट

जागतिक मंदिमुळे व्यापारीवर्ग हातावर हात धरुन बसलेला असताना भद्रकाली पोलिसांनी दुकानाबाहेर वस्तु ठेवल्याचा ठपका ठेवत व्यापाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यानुसार आता व्यापाऱ्यांना सोमवारी (ता. ७) जिल्हा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. मंदिच्या काळात एकएक ग्राहक महत्वाचा असताना व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईत वेळ दवडायचा का असा सवाल संतप्त व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.

येत्या दोन दिवसात दसरा असून काही दिवसात दिवाळी देखील तोंडावर येऊन ठेपली आहे. या काळात बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ असते. मात्र जागतिक मंदिमुळे नाशिकच्या उद्योगांना मोठा फटका बसला आहे. अनेक कारखान्यांमध्ये ले ऑफ सुरु आहे. त्यामुळे कामगारांना पुरेसे वेतन मिळत नाही. हजारो कंत्राटी कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्याचा सरळ परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांना ग्राहकांची वाट बघत दुकानात बसावे लागत आहे. या मंदिला कंटाळून अनेकांनी आपले व्यवसाय बदलल्याचीही चर्चा आहे. तर काहींनी नाशिक शहर सोडले आहे. अशा विदारक परिस्थितीत व्यापाऱ्यांना शासनाने दिलासा देणे अपेक्षीत असताना प्रत्यक्षात त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचा उरफाटा उद्योग पोलिसांनी सुरु केला आहे. भद्रकाली पोलिसांनी वाहतूक कोंडीकडे अंगुलीनिर्देश करीत व्यापाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. संबंधित व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील वस्तू रस्त्यावर ठेवल्याने तसेच काहींनी हातगाडीव्दारे वस्तुंची विक्री करीत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. ही बेकायदेशीर कृती असून महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १०२ व ११७ अन्वये ही कृती शिक्षेस पात्र आहे, असे नोटीशीत म्हटले आहे. या सर्वच व्यापाऱ्यांना सकाळी १०.३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालयात कागदपत्रांसह बोलविण्यात आले आहे.

पोलिसांच्या या नोटीसांमुळे व्यापारी वर्गात कमालीचे संतप्त वातावरण असून यापुढे आम्ही व्यवसायच करायचे नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंदिच्या काळात व्यापारीवर्ग पुरता भरडला जात आहे. त्यात पोलिसांचा अशा प्रकारचा ससेमिरा व्यापाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारा असल्याचे बोलले जात आहे.