घरमहाराष्ट्रनाशिकमहसूल विभागाबाबत आता व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रारी

महसूल विभागाबाबत आता व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रारी

Subscribe

महसूल विभागाशी संबधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आता सोशल मीडियाचा वापर केला जाणार

महसूल विभागाशी संबधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आता सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे. याकरिता स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे महसूल विभागाशी संबधित तक्रारींसाठी नागरिकांना आता कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. केवळ व्हॉटसअ‍ॅपद्वारे तक्रारींची सद्यस्थिती नागरिकांना घरबसल्या समजू शकणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून ही सेवा सुरू करण्यात येणार असून यात कोणत्या सेवांचा सामावेश असावा, याचा अभ्यास करण्यात येत आहे. यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेत अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

शासकीय कार्यालयात दाखल केलेल्या कामाचे नेमके पुढे काय झाले, हे कळण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिक अनेकदा कार्यालयात फेर्‍या मारतात. अनेकदा अधिकारी बैठकीत असल्याने नागरिकांना तासन् तास त्यांच्या दालनाबाहेर प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांचा वेळ आणि श्रमही वाया जातात. त्यातच काम झाले नसल्यास नागरिकांना माघारी फिरावे लागते. याकरता तंत्रज्ञानाची मदत घेऊन एक विशेष कक्ष स्थापन करण्याची संकल्पना जिल्हाधिकार्‍यांनी मांडली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. यात नागरिकांना एक व्हॉटसअ‍ॅप क्रमांक देण्यात येईल. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाने महसूलशी संबधित जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या अर्जाबाबत काही तक्रारी असल्यास किंवा या अर्जावर काय कार्यवाही झाली हे जाणून घ्यावयाचे असल्यास या व्हॉटसअ‍ॅपवर अर्जाची प्रत आणि विषय नमूद करून या क्रमांकावर पाठवायचा आहे. ही तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या कक्ष अधिकार्‍यांकडे प्राप्त होताच या अधिकार्‍यांमार्फत संबधित अर्ज संबंधित विभागप्रमुखाकडे पाठवला जाईल.

- Advertisement -

विभागप्रमुखाने तीन दिवसांत या अर्जांवर काय कार्यवाही केली याचे उत्तर देणे अपेक्षित आहे. विभागप्रमुखांकडून प्राप्त उत्तर संबधित अर्जदाराला पाठवले जाईल. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात हेलपाटे न मारता कामाची सद्यस्थिती समजू शकणार आहे. लवकरच हा क्रमांक सुरू करण्यात येणार असून विविध सेवाही वेळेत देण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत असल्याचे मांढरे यांनी सांगितले. यापूर्वी जिल्हाधिकारी मांढरे यांनी पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असताना २५८ अधिसूचित सेवा सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. याच धर्तीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये या सेवा लागू करण्याचा निर्णय राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी घेतला.

नागरिकांना मिळणार दिलासा

पुणे जिल्हा परिषदेत अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. याच धर्तीवर आता नाशिकमध्येही महसूल विभागाशी संबंधित येणार्‍या अडचणी, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी व्हॉटसअ‍ॅप क्रमांक दिला जाईल. यात कोणत्या प्रकारच्या तक्रारी असाव्यात याचा अभ्यास करण्यात येत आहे. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -