पुण्याची सूत्र थोरल्या साहेबांच्या हाती; कोरोना रुग्णांसाठी दिल्या ६ कार्डियाक ॲम्बुलन्स, १५० इंजेक्शन

sharad pawar in pune covid center
शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील वॉर रुमला भेट दिली.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये कार्डियाक Ambulance अभावी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चहुबाजूंनी सरकारवर टीका करण्यात आली होती. सगळ्याच माध्यमांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर आता महाविकास आघाडीचे आधारस्तंभ खासदार शरद पवार मैदानात उतरले आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे तसे पुण्यावर करडी नजर ठेवून होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक नियमावली राबविण्यापासून ते प्रशासनाला धारेवर धरण्यापर्यंत त्यांनी काम पाहिले. मात्र पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी साधी प्रतिक्रियाही दिली नव्हती. त्यानंतर शरद पवार यांनी दोन दिवस पिंपरी चिंचवड आणि पुण्याचा आढावा घेऊन पुणे शहरासाठी ६ कार्डियाक Ambulance आणि १५० रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे वाटप केले आहे.

पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेवर कार्डियाक Ambulance मिळू न शकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारले असले तरी त्यामध्ये सोयी-सुविधा आणि पुरेसे आरोग्य कर्मचारी नसल्याची ओरड सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर आता खुद्द शरद पवार Action मोडमध्ये आलेले दिसत आहेत. शरद पवार यांनी गुरुवार आणि शुक्रवारी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तर आज सकाळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली.

शरद पवार यांनी आज पुणे येथे खासदार अमोल कोल्हे, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण आणि स्थानिक आमदारांशी चर्चा केली. तसेच शनिवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शरद पवार स्वतः प्रयत्न करणार आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील हे सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वेळ द्यावा, अशी मागणी लावून धरत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात जास्त वेळ दिल्यास कोरोनाची स्थिती आटोक्यात येऊ शकते, असे वारंवार ते सांगत आले आहेत. राज्य सरकारने पुण्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी उपाययोजना देखील केल्या आहेत. पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची केवळ सहा महिन्यातच बदली करुन त्यांच्या जागी विक्रम कुमार यांना नियुक्ती देण्यात आली होती.