घरताज्या घडामोडीआरक्षणासाठी मराठा तरूणाची आत्महत्या, पार्थ पवारांनी दिला सरकारला इशारा!

आरक्षणासाठी मराठा तरूणाची आत्महत्या, पार्थ पवारांनी दिला सरकारला इशारा!

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाची मागणी देखील पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. न्यायालयाने राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजातून याला तीव्र विरोध होत असून राज्य सरकारने त्यासंदर्भात तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे. विरोधकांनी देखील याला पाठिंबा दिला असून राज्य सरकारने लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, बुधवारी मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार (Parth Pawar) यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधी भूमिका घेत दंड थोपटले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असं सांगतानाच आता या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही, असा इशाराच पार्थ पवार यांनी सरकारला दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी विवेकची आत्महत्या

आपले सर्व मुद्दे मांडण्यासाठी पार्थ पवार यांनी बुधवारी रात्री ११ वाजता ट्वीट केले आहेत. बीडमध्ये विवेक रहाडे नावाच्या तरुणानं नीट परीक्षेत मराठा आरक्षण नसल्यामुळे संधी मिळत नसल्याचं कारण सुसाईड नोटमध्ये लिहीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. विवेक आणि त्याच्या सुसाईड नोटचा (Suicide Note) फोटो ट्वीट करत पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

‘विवेकच्या मृत्यूमुळे मी पूर्णपणे हलून गेलो आहे. मराठा आरक्षणासाठी विवेकनं आत्महत्या केली. अशाच प्रकारच्या अजून घटना सुरू होण्याआधी मराठा नेत्यांनी झोपेतून जागं होण्याची गरज आहे. आरक्षणासाठी लढा देण्याची गरज आहे. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा’, असं आवाहन करतानाच सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाण्याचा इशारा देखील पार्थ पवार यांनी दिला आहे.

- Advertisement -

‘विवेकने आमच्या मनात पेटवलेली ठिणगी आख्खी व्यवस्थाच जाळून टाकू शकते. संपूर्ण पिढीचंच भवितव्य पणाला लागलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरलेला नाही. मराठा आंदोलनाची मशाल माझ्या ह्रदयात घेऊन विवेकसारख्याच अगणिक तरुणांसाठी न्याय मागण्यासाठी व्यवस्थेचे दरवाजे ठोठावण्याची माझी तयारी आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र’, असं देखील पार्थ पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -