Corona Quarantine : गणपतीसाठी गावी येणार्‍यांना क्वारंटाईन व्हावेच लागणार!

ganesh murti visarjan

येत्या २२ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival in Konkan) बाहेरगावाहून येणार्‍यांना १० ते १४ दिवसांपर्यंत क्वारंटाईन व्हावे लागणार असून, त्यासाठी नागोठणे विभागातील, तसेच पाली ग्रामपंचायतीने नियमावली जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी देण्यावरून आणि ती कोणत्या नियमांच्या आधारे दिली जावी यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाली ग्रामपंचायतीने आणि नागोठणे विभागातील इतर काही गावांनी जाहीर केलेली नियमावली महत्त्वाची ठरली आहे.

ग्रामपंचायती धोका पत्करण्यास तयार नाहीत!

गेल्या काही दिवसांपासून रोहे आणि सुधागड तालुक्यात कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा चिंताजनक असून, या पार्श्वभूमीवर कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय या ग्रामपंचायतींच्या प्रशासनाने घेतला आहे. नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी सांगितले की, १ ऑगस्टपासून ग्रामपंचायतीच्या कोव्हिड नियंत्रण कक्षात (Covid Center) बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची संख्या १२ पर्यंत झाली असून, त्यांना १४ दिवस क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे. तसेच त्यांचा हातावर शिक्का, तसेच संबंधित पत्रसुद्धा देण्यात आले आहे. येणार्‍यांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. वरवठणे, पिगोंडे येथेही हाच निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच राजश्री दाभाडे, संतोष कोळी यांनी दिली. कडसुरे, वणी, पाटणसई, वांगणी, पळस, ऐनघर आदी ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍यांनाही क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

दरम्यान, पाली येथे येणार्‍या चाकरमान्यांसाठी १२ तारखेची डेडलाईन देण्यात आली असून, त्यानंतर त्यांना १० दिवसांकरिता होम क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला असून, येणारे सर्वजण सहकार्य करतील, असा विश्वास सरपंच तथा कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीचे अध्यक्ष गणेश बाळके यांनी व्यक्त केला आहे.