राज ठाकरे काँग्रेसला मते देण्याचे आवाहन करणार का? – विनोद तावडे

आता राज ठाकरे काँग्रेसला मते देण्याचे आवाहन करणार का? असा सवाल विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना केला आहे.

Maharashtra
vinod tawde and raj thackeray
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला

मोदी सरकराच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत काँग्रेसवाले कोणत्याही प्रकारचे आरोप करू शकले नाही. अशोक चव्हाण यांच्यासारखे ‘आदर्श’ घोटाळे आम्ही केले नाहीत. तसेच चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळेत मुलींचे लैंगिक शोषण झाले. त्यावेळी चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांनी विजय वड्डेट्टीवार यांच्या उपस्थितीत पॉस्कोच्या माध्यामातून पैसे मिळतात, असे संतापजनक आरोप करत त्यांच्या या विधानाचा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी निषेध केला आहे. आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या जाहिर सभांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या काँग्रेसला मत द्या आणि देश वाचवणाऱ्या मोदीला देऊ नका, असे आवाहन करणार आहेत का? हे स्पष्ट करावे, अशी मागणी विनोद तावडे यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते, माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते अतुल शाह आदी उपस्थित होते.

पवारांना खोटे बोलणे शोभते का?

अशोक चव्हाण यांनी चंद्रपूरमधल्या काँग्रेस नेत्याच्या आश्रमशाळेत विद्यार्थीनीवर जे अत्याचार झाले त्याकडे प्रथम लक्ष द्यावे, असा टोला लगावत अशोक चव्हाण यांच्या भाजप-शिवसेनेने महाराष्ट्र चूलीत घातला या वक्तव्याचा समाचार घेतला. विनोद तावढे पुढे म्हणाले की, भारतीय संविधानावर १९७५ ला आणीबाणीच्या स्वरूपात सगळ्यात मोठा आघात घातला गेला. तेव्हा शरद पवार स्वत: काँग्रेस पक्षात होते. त्यामुळे पवारांना, असे खोटे बोलणे शोभते का? असा सवालही तावडे यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी नाशिकमध्ये एक आणि मुंबईमध्ये तीन सभा असणार आहेत. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मा. पुरूषोत्तम रूपाला यांची मुलुंड आणि घाटकोपरमध्ये सभा असणार आहे अशी माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावेळी दिली आहे.