घरमहाराष्ट्रलोकनाट्याचा राजा राजा मयेकर कालवश

लोकनाट्याचा राजा राजा मयेकर कालवश

Subscribe

आपल्या खुसखुशीत आणि खमंग अभिनयासाठी ओळखले जाणारे आणि लोकनाट्याचा राजा या उपाधीने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे शनिवारी दुपारी १२ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी ते 90 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच डॉक्टरांनी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.राजा मयेकर यांनी आपला विलक्षण अभिनय आणि हजरजबाबीपणा यांनी 60 वर्षे अभिनय क्षेत्र गाजवले. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी पाठी वळून पाहिले नाही.

विशेषत: दूरदर्शनवरील ‘गप्पागोष्टी’ ही त्यांची मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही पातळ्यांवर त्यांनी चतुरस्त्र कामगिरी केली. दशावतारी नाटकाच्या माध्यमातून राजा मयेकर यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. लोकनाट्यांतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमी अवगत करून घेतली. कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे यांच्यामुळे राजा मयेकर यांनी अभिनयाच्या प्रांतात प्रवेश केला. मयेकर सुरुवातीला मुंबईत एका चाळीत राहत असत. तिथेच राहणार्‍या एका माणसाकडे शाहीर साबळे यायचे. या चाळीत देशावरचे बरेच लोक राहत असत.

- Advertisement -

ते त्यांच्या देशी ढंगात बोलत असत, पण राजा मयेकर यांची बोलणे शुध्द असल्यामुळे इतरांमध्ये त्यांचा वेगळेपणा उठून दिसत असे. तो शाहीर साबळे यांना भावला. कलाक्षेत्र आणि भाषा हा दोघांनाही जोडणारा दुवा होता. त्यामुळेच पुढे त्यांचा परिचय वाढत गेला. वाण्याच्या चाळीत राहायला आल्यावर शाहीर साबळे यांनी कृष्णकांत दळवी आणि राजा मयेकर यांना सोबत घेऊन ‘शाहीर साबळे आणि पार्टी’ची स्थापना केली. ‘आंधळं दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’ आणि ‘असुनी खास घरचा मालक’ ही तीन लोकनाट्ये तुफान गाजली. ‘बापाचा बाप’, ‘नशीब फुटकं सांधून घ्या’, ‘कोयना स्वयंवर’ या नाटके लोकांनी डोक्यावर घेतली.

राजा मयेकर यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवताना विनोदाची पातळी कधीही घसरू दिली नाही. गुुंतता हृदय हे, सूर राहू दे, गहिरे रंग, श्यामची आई, धांदलीत धांदल, भावबंधन, एकच प्याला, संशयकल्लोळ, बेबंदशाही, झुंजारराव ही त्यांची नाटके गाजली. धाकटी बहीण, स्वयंवर झाले सीतेचे, कळत नकळत, या सुखांनो या, झंझावात, लढाई, धमाल गोष्ट नाम्याची हे त्यांनी भूमिका केलेले गाजलेले सिनेमा आहेत. गुंतता हृदय हे या नाटकात सोमजी मास्तरची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. दूरदर्शनवरील हास परिहास, गजरा, श्रद्धा, असे पाहुणे येती या कार्यक्रमात मयेकर यांंनी भूमिका केलेल्या भूमिका जागल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -