घरमहाराष्ट्रविधान परिषद निवडणुकीचा निकाल

विधान परिषद निवडणुकीचा निकाल

Subscribe

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींचे निकाल जाहीर झाले असून चार पैकी दोन जागांवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. तर कोकण विभागात निरंजन डावखरे विजयी झाले असून आमदार कपिल पाटील यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. अंत्यत चुरशीची ही निवडणूक झाली होती.

मुंबई शिक्षक आणि पदवीधर, नाशिक शिक्षक तसेच कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले असून विधान परिषदेच्या चार जागांपैकी दोन मतदारसंघात शिवसेनेने आपला झेंडा फडकावला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे विलास पोतनीस तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे हे उमेदवार विजयी झाले आहेत. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी या मतदारसंघात विजयाची हॅट्रीक केलेली आहे. तर सर्वांचे लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले आहे.

शिवसेनेने गड राखला

मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला गड कायम राखला असून येथे शिवसेना उमेदवार विलास पोतनीस विजयी झाले आहेत. त्यांना १९ हजार ३५४ मतं मिळाली असून त्यांनी भाजपचे उमेदवार अमितकुमार मेहता (७७९२ मतं) यांचा पराभव केला आहे. तर तिसऱ्या स्थानावर लोकभारतीचे जलींदर सरोदे (२४१४ मतं) आहेत. एकूण कोटा १६,९०० चा होता. त्यामुळे शिवसेनेने भाजपचा ११ हजार ६११ मताधिक्काने पराभव केला आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून कॅबिनेटमंत्री दीपक सावंत यांच्याऐवजी विलात पोतनीस यांना उमेदवारी दिली होती.

- Advertisement -

कपिल पाटलांची हॅट्रीक

मुंबई शिक्षक मतदारसंघाचा गड लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी राखला असून त्यांनी ३ हजार ७५१ मतं मिळवली आहेत. कपिल पाटील यांनी शिवसेनेचे शिवाजी शेंडगे (१५३८ मतं) आणि भाजप पुरस्कृत अनिल देशमुख (१०८२ मतं) यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे उमेदवार अनिल देशमुख यांचा दारुण पराभव झाला आहे. अनिल देशमुख हे तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विनोद तावडे विरुद्ध कपिल पाटील असा आखाडा रंगला होता. यात कपिल पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. कपिल पाटील यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे.

शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत १५ व्या फेरी अखेर शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण केला. टीडीएफ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्यावर विजय मिळवला. नाशिक मतदारसंघात किशोर दराडे १६ हजार ८८६ मतं मिळवून विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपाचे अनिकेत पाटील (६३२९ मतं) यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. दुसऱ्या स्थानावरील अपक्ष उमेदवार संदीप बेडसे यांना १० हजार ९७० मतं मिळाली आहेत.

- Advertisement -

निरंजन डावखरेंचा दणदणीत विजय 

कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांनी ३२ हजार ८३१ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या संजय मोरे यांचा २९८८ मतांनी पराभव केला असून अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत बाजी मारली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. विजयासाठी आवश्यक कोटा ३५,१४३ इतका होता. मात्र निरंजन डावखरे रिंगणात उरलेले एकमेव उमेदवार असल्यामुळे निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय घेत निरंजन डावखरे यांना विजयी घोषित केले. हा निकाल सर्वात उशीरा म्हणजेच आज सकाळी लागला.

विधान परिषद निवडणूक निकाल : भाजपचे निरंजन डावखरे विजयी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -