Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभलाय; सेनेचा चंद्रकांत पाटलांना टोला

महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभलाय; सेनेचा चंद्रकांत पाटलांना टोला

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे मुखपत्र असलेले ‘सामना’मध्ये छापून आलेल्या लेखातील भाषेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. यावरून आता शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत दादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखं असून महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे, असं म्हणत शिवसेनेने चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. ईडीच्या नोटीसीवरुन शिवसेनेचे खासदार, नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकेचे बाण सोडले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत कायदा मानत नाहीत का असा सवाल केला होता. त्याला उत्तर देताना सामनाच्या अग्रलेखात भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेना सामनाच्या अग्रलेखातून बरसली होती. यानंतर चंद्रकांत पाटील सामनाच्या संपादिका रशअमी ठाकरे यांना पत्र लिहिलं. चंद्रकांत दादा म्हणाले की, रश्मी ठाकरे यांना व्यक्ती म्हणून मी चांगला ओळखतो व मला खात्री आहे की, त्यांनाही ही भाषा आवडत नसेल. संपादक या नात्याने त्या या गोष्टींचा नक्की विचार करतील, अशी मी आशा बाळगतो. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत हे पत्र शेअर केलं. चंद्रकांत दादा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सामना ऑनलाईन, ऑफिस ऑफ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टॅग करून त्यांचेही लक्ष या पत्राकडे वळवलं. या पत्रावरुन आता सामनातून शेलक्या शब्दांत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधण्यात आला आहे.

“राज्यातील विरोधी पक्षाला त्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. बहकलेला विरोधी पक्ष हा महाराष्ट्रातील चिंतनाचा विषय ठरला आहे, पण चिंतन करायचे कोणी? भारतीय जनता पक्षाच्या चिंतन व मंथन बैठका अधूनमधून होत असतात, पण एक महाचिंतन बैठक घेऊन सध्याच्या विरोधी पक्षाने विधायक कार्यात कसे गुंतवून घ्यावे, याबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत, पण ‘चायपेक्षा किटली गरम’ असे काही लोकांचे सुरू आहे,” असा टोला चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. “मुंबईतील महाकाली गुंफा विकू देणार नाही, एक इंचही जागा बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही, अशा विरोधी वक्तव्याच्या उकळ्या काही किटल्यांना फुटल्या आहेत. भाजपच्या ध्यानीमनी, स्वप्नी ‘बिल्डर’च आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्णयात बिल्डरच दिसत असावेत. राज्य सरकारने कोणताही निर्णय घ्यायचा म्हटले की, ‘ब्लॅकमेल’ करणारी किरकिराटी मांजरे आडवी घालायची, हे जणू धोरणच झाले आहे,” अशी टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रेलेखातून केली आहे.

- Advertisement -

“एक इंचही जागा विकू देणार नाही! तिकडे लडाखच्या हद्दीत चीनचे सैन्य घुसून त्यांनी ‘इंच’भर नाही, तर मैलोन्मैल हिंदुस्थानी जमीन कब्जात घेतली आहे. त्यावर या किटल्या का तापत नाहीत, हा प्रश्नच आहे. लडाखची जमीन अगदी इंच इंच पद्धतीने चिन्यांच्या घशात गेली तर चालेल का, तेवढे जरा सांगा. भारतीय जनता पक्षाचे हे ढोंग आहे व या ढोंगाचा बुरखा चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मशहूर पत्रलेखकांनी आता फाडायलाच हवा. चंद्रकांत पाटील हे हल्ली वाचकांची पत्रे, तक्रारी सूचना वगैरे सदरांखाली पत्र लिहून अनेक विषयांना वाचा फोडतात. मुख्य म्हणजे भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. भाजपमध्ये नवे तर्खडकर उदयास आले असून संपूर्ण भाजपला त्यामुळे ‘गलिच्छ’ विचार आणि भाषेला तिलांजली द्यावी लागेल. काही चुकीचे बोललात की, पत्रलेखक पाटील त्यांची कागदी तलवार सपकन बाहेर काढतील व ‘तक्रारी सूचना’ सदरात वार करतील,” अशाप्रकारचे चिमटे शिवसेनेने सामनामधून चंद्रकांत पाटलांना काढले आहेत.

“महाकाली गुंफा प्रकरणाचेही चिंतन व संशोधन करून त्यावर पत्ररूपी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवरच येऊन पडली आहे. कारण भाजपातील किटल्या उकळत असल्या तरी त्या नको तिथून गळतही आहेत. या गळतीची तक्रार पाटलांनी तत्काळ पत्र लिहून राष्ट्रीय नेतृत्वाकडे करायला हवी. मोदी सरकारने देशातील अनेक सार्वजनिक उपक्रम ‘इंच इंच’ नव्हे, तर अगदी घाऊक पद्धतीने ‘प्रिय’ बिल्डर लॉबीच्याच घशात घातले. बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन ही मातब्बर कंपनी विक्रीला काढली आहेच आणि त्यातून सुमारे 90 हजार कोटी सरकारला मिळतील, असा अंदाज आहे. पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंतच्या सरकारांनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकली जात असताना महाकाली गुंफेत शिरलेल्या या इंचभर किटल्या कुठे होत्या? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

- Advertisement -

“चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरूच केली आहे. प. बंगालातील भाजप नेत्यांची अलीकडची भाषणे दादांच्या हवाली करूया. तेथे भाषाशुद्धीसंदर्भात मोठे काम चंद्रकांत पाटलांना करावे लागणार आहे. चीनने लडाखची जमीन गिळली तरी चालेल, पण मुंबईतल्या इंच इंच जमिनीसाठी किटल्यांनी उकळायलाच पाहिजे! दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला! महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे!” असा टोला शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांना लगावला.

 

- Advertisement -