शिवसेनेमुळेच होत आहे बेस्ट कामगारांचे गिरणी कामगार – शशांक राव

शिवसेनेमुळेच होत आहे बेस्ट कामगारांचे गिरणी कामगार असे वक्तव्य बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी केले आहे.

Mumbai
Shivsena chief Uddhav Thackeray targets BJP through Saamana Newspaper
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट बसच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. महापालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये गेल्या चार दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. गुरुवारी झालेली चर्चा देखील निष्फळ ठरली आहे. यामुळे बेस्ट कामगारांचे गिरणी कामगार होण्याची भिती बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.

शिवसेनेची सत्ता असतानाही प्रश्न प्रलंबित

महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना देखील त्यांचे बेस्ट उपक्रमावर आणि आयुक्तांवर नियंत्रण नाही असा आरोप बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर प्रश्न सुटेल असे वाटत होते. मात्र सात तासाच्या बैठकीनंतर देखील हा प्रश्न सुटलेला नाही.

गिरणी कामगार होण्याची भिती

असे मरतच आहोत तर लढून मरु, या तयारीनेच कामगार संपात उतरले आहेत. दर महिन्याचा पगार वेळेत हातात पडत नाही, त्यामुळे कर्ज घ्यावे लागते. पंधरवड्यानंतर मिळालेला पगार कर्ज फेडण्यात जातो. त्यात मुलांचे शिक्षण, औषधपाण्याचा खर्च, कामगारांनी जगायचे तरी कसे असा प्रश्व शशांक राव यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकार गप्प आहे

महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना देखील त्यांना बेस्टवर तोडगा काढणे कठीण का जात आहे असा प्रश्व उपस्थित केला आहे. बेस्टमध्ये बहुतांशी मराठी बांधव आहेत. त्यांना रस्त्यावर आणणार का? आयुक्त ऐकत नसतील तर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणा. पण कामगारांचे हाल थांबवा, त्यांना न्याय मिळवून द्या.


वाचा – बेस्टच्या संपाचा चौथा दिवस; संपामुळे बेस्टचे ९ कोटींचे नुकसान