धक्कादायक! शौचालयाच्या टाकीत सापडला मानवी सांगाडा

एका शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचा सांगाडा सापडला असल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.

skeleton of an unidentified body found in toilet tank at pimpri
मृतदेह

पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरीमध्ये एका शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचा सांगाडा सापडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

अशी आली घटना उघडकीस

पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परिसरात काही स्थानिक नागरिक पाण्याच्या टाकीत असलेले मासे काढण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यावेळी त्यांना त्या टाकीत एक पोते आढळून आले. ते पोते पाहून त्यांना धक्काच बसला. कारण त्या पोत्यात एका अज्ञात व्यक्तीचा सांगाडा आढळून आला. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांनी पाचारण केले आणि घटनेची माहिती दिली.

हा मृतदेह कोणाचा आहे? आणि पाण्याच्या टाकीत कोणी टाकला? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पोत्यामधील मृतदेह हा पूर्णपणे सडला आहे. बऱ्याच दिवसांआधी मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कारण शरीराचा केवळ सांगाडाच शिल्लक असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी टाकीतून सांगाडा बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अनेक गोष्टींचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा – बाळ होण्यासाठी सात वर्षाच्या मुलीचे पुजले यकृत