पालकांच्या लेखी संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश – मार्गदर्शक सूचना जारी

शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत राज्य सरकारने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

२३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत राज्य सरकारने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये खुल्या मैदानात वर्ग घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांना एक दिवस आड शाळेत बोलवण्यात येणार असून, उर्वरित ५० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत.

शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, थर्मोमीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जंतूनाशक,साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने सुनिश्चित करावी, शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण करावे, क्वारंटार्सन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान कोविड १९ साठीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करायचे आहे. वर्गखोली तसेच स्टाफरूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी, वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी. शाळेत दर्शनी भागावर शारीरिक अंतर, मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे पोस्टर्स प्रदर्शित करावे. थूंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्यासाठी किमान सहा फूट इतके शारीरिक अंतर राखले जाईल. यासाठी विशिष्ट चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ इत्यादींचा वापर गर्दी होणारी ठिकाणे जसे पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे इत्यादी ठिकाणी करण्यात यावा.

शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे एकाच दिवशी ५० टक्के विद्यार्थी ऑनलाईन वर्गात व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेतील. इयत्तानिहाय ऑनलाईन व ऑफलाईन वर्गांचे वेळापत्रक, शिक्षकांची जबाबदारी निश्चिती याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा अधिक असू नये. प्रत्यक्ष वर्गांसाठी जेवणाची सुट्टी असेल. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहुनही अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मुल्यांकनासाठी विशिष्ठ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी. हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅण्डवॉश व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. शक्य असल्यास अल्कोहोल मिश्रित हॅण्ड सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावा. विद्यार्थी मास्कची अदलाबदल करणार नाहीत, याची दक्षता शिक्षकांनी घ्यावी. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्‍यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही शाळेच्या आवारात प्रवेश देऊ नये. संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वत:च्या वैयक्ति वाहनाने शाळेत सोडावे. शाळा वाहनाचे दिवसातून किमान दोनवेळा निर्जंतुकीकरण करावे. अशा महत्त्वपूर्ण सूचना शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.