घरदेश-विदेशहैदराबाद एन्काऊंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

हैदराबाद एन्काऊंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

Subscribe

उद्या होणार सुनावणी

हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असतानाच काही ठिकाणी या कृतीवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यासाठीच आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हैदराबाद पोलिसांनी केलेलं कृत्य हे बेकायदा असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. येत्या सोमवारी म्हणजेच ९ डिसेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

विशेष म्हणजे. हैदराबाद उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून सर्व मृत आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरपर्यंत जतन करून ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

- Advertisement -

२७ नोव्हेंबरला हैदराबादच्या शादबाग परिसरामध्ये एका डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर तिला जाळून टाकल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेगाने पावले उचलत चार आरोपींना अटकदेखील केली. मात्र, शुक्रवारी पहाटे घटनास्थळावर आढावा घेण्यासाठी आरोपींसह पोहोचलेल्या पोलिसांना चकवा देऊन आरोपी पळाले आणि नाइलाजाने स्वसंरक्षणासाठी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात आरोपींचा मृत्यू झाला, अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे.

शुक्रवारी पहाटे घटनास्थळावर जाऊन पोलिसांनी गुन्हा कसा घडला, हे आरोपींना सांगायला लावले. या आरोपींनी पळून जायच्या उद्देशाने पोलिसांवर काठ्या आणि दगडांनी हल्ला केला. शिवाय दोन पोलिसांच्या बंदुका घेऊन त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर द्यावे लागले. यामध्येच या चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितली. त्यानंतर पोलिसांच्या या कृत्याचे समर्थन करणार्‍यांनी देशात अनेक ठिकाणी जल्लोष केला. मात्र, अशा प्रकारे न्यायालयाच्या बाहेर आरोपींना शिक्षा देणे बेकायदा असल्याची टीका केली गेली. त्यावरून मोठी चर्चा आता सुरू झाली असून त्याचा निकाल आता येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या एन्काऊंटरमध्ये अनेक संशयास्पद गोष्टी घडल्याचा दावा करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -