घरमहाराष्ट्रतानसा धरणातील पाणी पातळी खालावली

तानसा धरणातील पाणी पातळी खालावली

Subscribe

उन्हाळ्यात तानसा धरणाची पाण्याची पातळी प्रचंड खालावत चालल्याने तानसाच्या मुख्य भितींतून होणारा पाण्याचा पाझर आणि गळती रोखण्यासाठी धरण माथ्यावर सुरू करण्यात आलेली ग्राऊंटींगची कामे तातडीने बंद करावी लागली आहेत. धरणात पाणीसाठा पुरेसा नसल्याने धरणाचे गळतीचे पॉइंट पाण्याअभावी शोधणे आताअवघड झाल्याने अभियंत्यांनी ग्राऊंटींगची कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

एकूण 38 दरवाजे 133 फूट उंची आणि 2834.64 मीटर लांबी असलेल्या तानसा धरणाची 40 हजार 660 दशलक्ष गॅलेन पाणी साठवण क्षमता आहे. मुंबईची जीवन वाहिनी समजल्या जाणार्‍या तानसा धरणातून प्रतिदिन 455 एमएलडी पाणी रोज मुंबईला पुरविले जाते. याच तानसा धरणाच्या मुख्य भितींतून पाण्याचा पाझर सुरू असल्याचे पावसाळ्यापूर्वी धरण सुरक्षा संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले. धरणाची मुख्य भिंत पाण्याने पाझरुन ओली होत आहे. याचाच अर्थ धरणाच्या भिंतीला गळती लागल्याचे निदर्शनास आले.

- Advertisement -

ही गळती पुढे वाढण्याची भिती असल्याने भविष्यात ही गळती अधिक वाढू नये याकरता वेळीच खबरदारी म्हणून धरणाच्या मुख्य भिंतीचे मजबुतीकरण करण्यासाठी व भितींतून होणारा पाण्याचा हा पाझर लवकरात लवकर थांबविण्यासाठी ग्राऊंटींगची कामे तानसा जलविभागाकडून सुरू करण्यात आली होती. परंतु धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने गळतीचे पॉईंट अभियंता आणि कंत्राटदार यांना शोधणे कठिण झाले आहे. सध्या धरणात 121.944 मीटर्स (400.08) इतकाच पाणीसाठा आहे.

गळतीचे काम करण्यासाठी धरणात पाण्याचा मुबलक पाणीसाठा असणे गरजेचे असते. यामुळे भिंत पाझरत असलेल्या ठिकाणाचे मुख्य पॉईंट शोधणे शक्य असते आणि तेथील ठिकाणी ग्राऊंटींगची कामे करता येतात. मात्र तानसा धरणाची पाण्याची पातळी एप्रिल महिन्यात पूर्णपणे खालावली आहे. यामुळे गळती रोखण्याचे काम बंद करावे लागले आहे. असे तानसा धरणाचे कनिष्ठ अभियंता दिनेश उमवणे यांनी सांगितले. ही गळती रोखण्यासाठीची कामे आता सप्टेंबर महिन्यात करणे शक्य होतील, असे ते म्हणाले.

- Advertisement -

गळती रोखण्यासाठीच्या या कामासाठी एकूण 90 लाख रुपयांची खर्चाची तरतूद मुंबई महापालिकेनी केली आहे. तसेच ग्राऊंटीगचे काम पूर्ण करण्यास साधारण आठ महिन्याचा अवधी लागेल, असे अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -