ठाण्यातील शिक्षकांचा पेच कायम, १५२ शिक्षकांच्या बदल्या रद्द

पुन्हा नव्याने प्रक्रिया राबविणार

शाळा सुरू होत असलेल्या आठवड्यातच ठाणे जिल्ह्यातील १५२ शिक्षकांच्या बदल्यांचा प्रशद्ब्रा सामोपचाराने मिटल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अवघ्या पाच दिवसात या बदल्या रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता पुन्हा नव्याने बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

बदली करताना अन्याय झालेल्या शिक्षकांनी न्यायालयात दाद मागितली होती. गेल्या शुक्रवारी ठाण्यात समुपदेशाने त्यांचे प्रशद्ब्रा सोडविण्यात आले. त्यामुळे बदलीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे आणि शिक्षणाधिकारी संगीता भागवत उपस्थित होते. जिल्ह्यातील बहुतेक शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोयीच्या शाळा घेतल्याचा आरोप करून १०९ शिक्षकांनी न्यायलयात धाव घेतली होती. तसेच जिल्ह्यांतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये काही अपंग शिक्षकांना लांबची शाळा मिळाली. तसेच अन्य काही कारणांनी ६२ शिक्षकांनी न्यायलायात दाद मागितली होती.

या सर्व प्रकरणावर कोकण विभागीय आयुक्तांच्या दालनात सुनावणी पार पडली. त्यानंतर शुक्रवारी या सर्व शिक्षकांचे समुपदेशन करुन बदल्या करण्यात आल्या. यामध्ये दोन मुख्यधायापक, ४४ पदवीधर आणि ११० शिक्षकांचा समावेश होता. त्यापैकी १९ शिक्षकांनी पूर्वी बदलीसाठी अर्ज केले होते. मात्र, नंतर त्यांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ते १९ शिक्षक सोडून १३७ प्राथमिक शिक्षकांच्या पारदर्शकपणे बदल्या करण्यात आल्या. यामुळे शिक्षकांना त्यांच्या मागणीनुसार शाळा मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे.