मृत्यूनंतर देहदान, वधू-वरांची एड्स चाचणी करणार

कशेळे ग्रामस्थांचा स्तुत्य निर्णय

Mumbai

कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी मृत्यूनंतर देहदान करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. मंगळवारी पार पडलेल्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. याचसोबत वधू-वरांची विवाहपूर्व एड्स चाचणी करण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावांची सध्या विशेष चर्चा होत असून ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उपसरपंच आत्माराम खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सामाजिक कार्यकर्ते हरेश राणे यांनी ग्रामस्थांनी मृत्यूनंतर देहदान करावे, असे आवाहन केले. मृत्यूनंतर आपले सर्व अवयव जळून त्याची राख होणार असते. त्या ऐवजी आपण देहदान केले तर प्रत्येक अवयव कोणा तरी गरजूच्या कामास येईल. त्या व्यक्तीच्या जीवनात यामुळे आनंद निर्माण होऊन आपण याच अवयवांच्या माध्यमांतून अनेक वर्षे पुन्हा जगू, अशी संकल्पना मांडली. यावेळी ग्रामस्थांनी या संकल्पनेला एकमुखी मान्यता दिली.

सरपंच हर्षला राणे या अवयव दानाचा पहिला फॉर्म भरतील आणि अनेक ग्रामस्थ रितसर फॉर्म भरून देहादानाचे कायदेशीर सोपस्कार पार पाडतील, असे ग्रामसभेत ठरले. दुसरा महत्त्वाचा ठराव म्हणजे गावातील तरुण-तरुणींचा विवाह जमविण्यापूर्वी वधू-वरांची एड्स चाचणी करण्यात येईल. कोणा एकाच्या चुकीमुळे दुसर्‍याचे जीवन बरबाद व्हायला नको, हा या मागचा उद्देश सर्वांनी मान्य करून ग्रामसभेने या ठरावाला एकमताने सहमती दर्शविली.

तसेच यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष पदी सदानंद मते, तर उपाध्यक्षपदी छगन ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामसेवक थोरवे यांनी सभेचे इतिवृत्त वाचून ग्रामसभेचा उद्देश सांगितला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी मते, तुकाराम पाटील, जयराम हरपुडे, गणपत मते, स्वप्निल मते, रमेश मते, अमोल पाटील, रुपेश हरपुडे, सचिन राणे,जनार्दन खंडागळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.