घरमहाराष्ट्रचाकण एमआयडीसी कंपनीतील चोरटे जेरबंद!

चाकण एमआयडीसी कंपनीतील चोरटे जेरबंद!

Subscribe

चाकण एमआयडीसीमध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यापैकी कुरुळी येथील महाले वेअर इंडिया कंपनीतील चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांना तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल हाती लागला आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी याच कंपनीत काम करणार्‍या एका सुरक्षा रक्षकासह आणखी एका इसमाला अटक केली आहे. बिरेंद्र गंगाधर यादव (४५) आणि संतोष अशोक कुमावत (४३) या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बिरेंद्र हा हवेली तालुक्यातील येलवाडी गावाचा आहे तर संतोष हा देहूगावचा आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
कुरुळी येथील महाले वेअर इंडिया कंपनीच्या लॉजिस्टीक वेअर हाऊसमध्ये चोरट्यांनी प्रवेश करुन तब्बल ७ लाख ४२ हजार रुपये किमतीचे एकूण १२५ कॉम्प्रेसर पार्ट चोरी केले. चोरट्यांना वेअर हाऊसच्या उघड्या शटरमार्फत प्रवेश केला होता. हा प्रकार १ सप्टेंबर २०१८ ते १ डिसेंबर २०१८ या चार महिन्यांच्या दरम्यान घडली. याबाबत कंपनीचे अधिकारी योगेश संभाजीराव फडतरे यांनी चाकण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. गुन्ह्याच्या तपासणीत चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, बिरेंद्र यादव हा के.एस.एच लॉजिस्टीक वेअर हाउसमध्ये यापूर्वी खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता. तो आणि त्याचा साथीदार संतोष कुमावत यांनी चोरी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मग पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला.

- Advertisement -

पोलिसांनी असे पकडले चोरांना
पोलिसांनी चाकण एमआयडीसी येथील स्पायसर चौकात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांची चौकशी केली. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना त्यांच्याजवळ ९ लाख १० हजार रुपयाचे कॉम्प्रेसर पार्ट आणि ए.सी. कंट्रोल पॅनेल मिळाले. पोलिसांनी त्यांना अटक करुन सर्व माल जप्त केला.

चाकण पोलिसांनी या महिन्यात अशा प्रकारे कंपनीमध्ये स्पेअरपार्ट चोरी करणारी दुसरी टोळी अटक केली असून दोन्हीमध्ये आरोपी हे सिक्युरीटी गार्ड म्हणून काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चाकण पोलिसांतर्फे सर्व कंपन्यांना आवाहन करण्यात आले आहे की, सिक्युरीटी एजन्सी नेमताना त्यांचे पोलीस व्हेरीफिकेशन करुन घेणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -