घरमहाराष्ट्रसंयमी नेतृत्वाचा विजय !

संयमी नेतृत्वाचा विजय !

Subscribe

गुरुवारी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. त्यामुळे अवघ्या देशाला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे व्यक्तीमत्त्व नव्याने जाणून घ्यावे लागणार आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहिले. परंतु तरीही संपूर्ण सत्तेवर नियंत्रण ठेवण्याची किमया त्यांनी साधली. म्हणूनच बाळासाहेब राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते लोकसभा अध्यक्षापर्यंत सर्व पदांवर हुकुमत गाजवू शकले. त्यांच्याप्रमाणेच बाळासाहेबांचे वासरदार म्हणून उद्धव ठाकरे हेही निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहतील असा समज सर्वांचा होता. किंबहुना उद्धव ठाकरे यांनीही जेव्हापासून राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला तेव्हापासून हेच धोरण अवलंबले होते.

मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या या धोरणात बदल केला. आज ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. कोणताही प्रशासकीय कामाचा अथवा विधीमंडळ कामकाजाचा अनुभव नसतानाही उद्धव यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. यावरून त्यांच्यात नवनवीन आव्हाने पेलण्याची ताकद क्षमता वाढल्याचे दिसले. इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी जी मानसिकता लागते, ती त्यांची झालेली आहे, हे उद्धव यांनी मागील महिनाभर ज्या प्रकारे राजकीय डावपेच संयमीपणे खेळले यावरून स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

शिवसेेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वभाव वैशिष्ठ्यातील सर्वात महत्त्वाचा गूण हा त्यांची आक्रमक भाषा. भर सभेतील भाषण असो की चारचौघातील गप्पागोष्टी, बाळासाहेबांच्या भाषेत कायम आक्रमकपणा दिसून आला, त्यात बर्‍याच प्रमाणे शिवराळपणा असायचा, परंतु तो कधी कुणाच्या जिव्हारी लागला नाही, हे वैशिष्ठ्य. उद्धव ठाकरे यांना मात्र हा गूण जाणीवपूर्वक आत्मसात करावा लागला. विशेषत: राज ठाकरे यांनी जेव्हा मनसेची स्थापना केली, तेव्हा शिवसैनिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषेत आक्रमकता आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मात्र भाषेत शिवराळपणा टाळला. त्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व कायम सौज्वळ राहिले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’ हा गड बनवला. अवघ्या महाराष्ट्रापासून देशभरातील लोक, प्रतिष्ठित उद्योजक, नेते, साहित्यिक, खेळाडू असे सर्व क्षेत्रांतील घटक बाळासाहेबांना भेटायला ‘मातोश्री’त येत. ८०च्या दशकानंतर बाळासाहेब केवळ जाहीर सभांद्वारेच जनसमुदायाशी बोलत. मात्र शिवसैनिकांची त्यांच्यावरील निस्सीम भक्तीमुळे त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. उद्धव ठाकरे यांना मात्र शिवसैनिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ‘मातोश्री’तून बाहेर पडावे लागले. मागील सात-आठ वर्षांत उद्धव यांनी ग्रामीण भागात प्रत्यक्ष जावून शिवसैनिकांच्या गाठीभेठी घेतल्या. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भाग पिंजून काढला. २०१९मध्ये तर त्यांनी महाराष्ट्राचे अनेक दौरे केले. शेतकर्‍यांच्या घरी जावून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. जनसामन्यांच्या गर्दीत मिसळून त्यांचा विश्वास संपादीत करण्याचा काँग्रेसी नेत्यांचा गूण उद्धव यांनी खुबीने आत्मसात केला. अशा प्रकारे उद्धव यांनी स्वत:ला लोकनेते म्हणून सिद्ध केले.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील एकबाणी, एकवचनी हा स्वभाव मात्र उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मूलत: दिसून आला. बाळासाहेबांनी उभ्या आयुष्यात कुणालाही दिलेला शब्द कधी मागे घेतला नाही. उद्धव ठाकरे यांनीही कायम बोलताना विचारपूर्वक भूमिका मांडली, त्यापासून कधी माघार घेण्याची त्यांच्यावर वेळ आली नाही. म्हणूनच उद्धव यांनी ‘ही ठाकरे घराण्याची संस्कृती आहे’, असे अनेकदा ठासून सांगितले.

१९९२ला बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत जातीय दंगली उसळल्या. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांची जी आक्रमकता दिसली, तशी मात्र उद्धव यांच्यात कधीच दिसली नाही किंबहुना उद्धव ठाकरे हिंसाचाराला कायम नियंत्रणात ठेवणासाठी आग्रही राहिले. जेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी पडली. तेव्हापासून उद्धव यांनी शिवसैनिकांना हिंसाचारापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. परिणामी शिवसेनेची आक्रमकता उद्धव यांच्या कार्यकाळात कमी झाली, असा वारंवार आरोप होऊ लागला आणि होत आहे, मात्र त्यामुळे शिवसेनेची व्याप्ती कधी गोठली नाही. उद्धव यांनी म्हणूनच त्यांच्या अवतीभवती जो समुह निर्माण केला, त्यातील सर्व जण हे नेमस्त आहेत. कुणीही आक्रमक नाही, सुभाष देसाई, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, नीलम गोर्‍हे अशी त्यातील काही उदाहरणे आहेत. या गुणांचा उद्धव जेव्हा मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार हाती घेतील, तेव्हा त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल.

‘मी आणि माझी शिवसेना’ हेच राजकीय विश्व बाळगूण असणारे उद्धव ठाकरे यामुळे भाजप पक्षाच्या व्यतिरीक्त कुणाशी अधिक जवळीक करू शकले नाहीत किंबहुना तसा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. तशी राजकीय अपरिहार्यताही निर्माण झाली नाही. मात्र याउलट बाळासाहेबांचे व्यक्तीमत्व होते. त्यांनी सर्व पक्षांतील नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवले, त्यामुळे बाळासाहेब सर्व पक्षांतील नेत्यांना आपलेसे वाटले. आज उद्धव यांनी त्यांच्या स्वभावातील ही उणीवही दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. म्हणून २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात उद्धव यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यापासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. आता मुख्यमंत्री पद सांभाळता आघाडीतील अन्य मित्र पक्षांनाही सांभाळून घेतांना त्यांच्यातील हा गुण अधिक उजळणार आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -