घरदेश-विदेशटीआरपी घोटाळा : तिघांविरुद्ध ३६०० पानांचे आरोपपत्र

टीआरपी घोटाळा : तिघांविरुद्ध ३६०० पानांचे आरोपपत्र

Subscribe

आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचा दावा

बहुचर्चित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी सोमवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी लोकल कोर्टात 3600 पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे. त्यात 51 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली असून या आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. स्वत:च्या चॅनेल्सचे टीआरपी वाढविण्यासाठी संबंधित चॅनेल्सकडून आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. आगामी काळात संबंधित चॅनेल्सच्या मालकासह इतर वरिष्ठांविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

विकास शंकरलाल खानचंदानी, रोमिल विनोदकुमार रामगडिया आणि पार्थो निर्मल दासगुप्ता अशी या तिघांची नावे आहेत. यापूर्वी याच गुन्ह्यांत अटकेत असलेल्या विशाल वेद भंडारी, बोमपेल्लीराव नारायण मिस्त्री, शिरीष सतिश पत्तनशेट्टी, नारायण नंदकिशोर शर्मा, विनय राजेंद्र त्रिपाठी, उमेश चंद्रकांत मिश्रा, रामजी दुधनाथ शर्मा, दिनेशकुमार पन्नालाल विश्वकर्मा, हरिष कमलाकर पाटील, अभिषेक भजनदास कोलवडे ऊर्फ अजित ऊर्फ अमित ऊर्फ महाडिक, आशिष अभिदूर चौधरी, धनश्याम दिलीपकुमार सिंग या बारा जणांवर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध 406, 409, 420, 465, 468, 406, 174, 179, 120 ब, 201, 204, 212, 34 भादंवि कलमांतर्गत आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.

- Advertisement -

सोमवारी दाखल झालेले पुरवणी आरोपपत्र असून या गुन्ह्यांचा पुढील तपास हा क्रिमिनल प्रोसिजर कोडमधील तरतुदींनुसार चालू राहणार आहे. गुन्ह्यांच्या पुढील तपासामध्ये मिळून आलेल्या पुराव्यांच्या आधारे या आरोपींसह वॉन्टेड आरोपींविरुद्ध नंतर आरोपपत्र सादर केले जाणार आहे. टीआरपीमध्ये फेरफार करुन चुकीच्या पद्धतीने टीआरपी वाढविण्यात आल्याची तक्रार बीएआरसी कंपनीने काम दिलेल्या हंसा कंपनीच्या निदर्शनास आले होते. कंपनीने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हे शाखेत संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल होताच दोन खासगी चॅनेल्सच्या मालकासह हंसा कंपनीच्या काही कर्मचार्‍यांना पोलिसांनी अटक केली होती. पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे सात पथके विविध राज्यांत गेली होती. याच गुन्ह्यांत पोलिसांनी काही जाहिरात कंपनीच्या वरिष्ठांची जबानी नोंदविली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -