घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे किंग की किंगमेकर

उद्धव ठाकरे किंग की किंगमेकर

Subscribe

भारतीय जनता पार्टीने राज्यात सरकार स्थापण्यासाठी संख्या बळाअभावी असमर्थता दाखवल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. संख्याबळात दुसर्‍या स्थानावर असलेल्या शिवसेनेला सोमवारी सायंकाळी सात वाजताची वेळ राज्यपालांनी दिल्यानंतर मातोश्री, सिल्वर ओक आणि काँग्रेसच्या गोटातही मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपच्या सत्ता स्थापनेत खोडा घालणार्‍या उद्धव ठाकरे यांच्याभोवती सत्तेची समीकरणे केंद्रीत झाल्यानंतर रविवारी रात्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ’किंग होणार की किंगमेकर’ याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये मुख्यमंत्रीपदी ठाकरे कुटुंबातील कोणी बसणार की उद्धव यांनी आश्वस्त केल्याप्रमाणे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार या प्रश्नाने राजकीय वातावरण तापले आहे.

रविवारी मालाडच्या मढ येथील रिट्रीट या पंचतारांकित हॉटेलमध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी मार्गदर्शन केले.त्याच वेळी ’आतापर्यंत मी इतरांच्या पालख्या वाहिल्या आता मला सत्तेच्या पालखीत माझ्या शिवसैनिकाला बसवायचे आहे’ असे वक्तव्य करून उद्धव यांनी आपल्याला किंग नव्हेतर किंगमेकर होण्यात स्वारस्य असल्याचे स्पष्ट केले. रविवारी संध्याकाळी भाजपच्या कोअर टीममध्येमध्ये दिर्घ मंथन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भाजप संख्याबळाअभावी सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

त्यानंतर ‘रिट्रिट’मधून आमदारांबरोबर वास्तव्याला असलेले युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे हे लगबगीने मातोश्री निवासस्थानी रवाना झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील होते. आमदारांसाठी गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेलवर करण्यात आले होते. मात्र भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेना नेत्यांनी स्वप्निलच्या सुरमयी कार्यक्रमा ऐवजी राजकीय सुरांची मैफल जमवणेच पसंत केले.

रविवारी पहाटे वांद्रे येथे काही ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे त्यांनी विराजमान व्हावे अशा आशयाचे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे बसणार की शिवसैनिकांपैकी कोणी बसणार या चर्चेने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली होती. उद्धव ठाकरे यांचा सुभाष देसाई यांच्यावर पराकोटीचा विश्वास आहे. मात्र रिट्रीट सहित जयपूरमधील हॉटेलमध्ये काँग्रेसने ठेवलेल्या आमदारांच्या पसंतीचा कानोसा घेतला असता लोकप्रतिनिधींची पसंती ही एकनाथ शिंदे यांनाच दिसत होती. एकनाथ शिंदे ’मराठा’असून पश्चिम महाराष्ट्रातील सातार्‍याचे आहेत. ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून ते चौथ्यांदा 89 हजार 32 मतांच्या दणदणीत आघाडीने निवडून आलेले आहेत.आदित्य ठाकरे यांनी त्यांचे नाव गटनेते पदासाठी सुचविल्यामुळे सत्तासंघर्षात त्यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

आदित्य यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव गटनेते पदासाठी सुचवल्यानंतर त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. अशाच रितीने जर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवण्याचे काम शिवसेनेच्या काही नेत्यांनी केले तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र गेले सोळा दिवस मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचा आहे, असा घोषा लावून ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे “वर्षा”वर जाण्याचे स्वप्न पाहणार्‍या ठाकरे परिवाराने स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी हा सत्तेचा खेळखंडोबा घडवून आणला अशी प्रतिमा तयार होऊ शकते.

ती होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे हेदेखील शिंदे यांच्या नावावर आपली मोहोर उमटवतील, असा जाणकारांचा होरा आहे. सोमवारी सायंकाळी शिवसेनेच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करील. तेव्हा इतर पक्षातील आमदारांची मदत ही सुभाष देसाईंपेक्षा एकनाथ शिंदे यांच्यामागे मोठ्या प्रमाणात उभी राहू शकते, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एरवी थेट संसदीय प्रक्रीयेत सहभागी होण्यापेक्षा रिमोट कंट्रोलद्वारे सत्ता चालवणार्‍या मातोश्रीचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे किंग होणार की किंगमेकर होऊन सामान्य शिवसैनिकांला राज्याच्या प्रमुखपदी बसवणार याचा फैसला काही तासातच होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -