घरमुंबई156 बेरोजगार तरुणांना 41 लाखांचा गंडा

156 बेरोजगार तरुणांना 41 लाखांचा गंडा

Subscribe

मुंबई:विदेशात नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणार्‍या एका महिलेस नागपाडा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. प्रियांका प्रज्योत गडकर असे या 40 वर्षीय आरोपी महिलेचे नाव असून पोलीस कोठडीनंतर तिला येथील स्थानिक न्यायालयाने 21 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात प्रियांकासह इतर आरोपींनी आतापर्यंत 156 बेरोजगार तरुणांकडून घेतलेल्या सुमारे 41 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.मोहम्मद दिलशाद मिराज अहमद राईन हा 27 वर्षांचा तरुण वडाळा परिसरात राहत असून व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहे. त्याला विदेशात नोकरी करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्याला त्याचा भाऊ मोहम्मद चाँद याने मुंबई सेंट्रल येथे मॅक्स कन्सल्टन्ट नावाची एक कंपनी असून या कंपनीने अनेकांना विदेशात नोकरी दिली असल्याचे सांगितले. त्यामुळे 4 मे 2018 रोजी मोहम्मद दिलशाद हा डॉ. डी. बी. मार्ग रोडवरील नवजीवन सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरील मॅक्स कन्सल्टन्टच्या कार्यालयात गेला होता. तिथेच त्याची प्रियांकासोबत ओळख झाली होती. तिने त्याला तुर्की, फ्रान्स आणि अन्य काही देशांमध्ये हेल्परची नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.

५५ हजार भरले

पासपोर्ट, व्हिसा, वैद्यकीय तपासणी आणि विमान तिकीट आदी कामासाठी त्याला 55 हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानंतर त्याने एका महिन्यात प्रियांकाला 55 हजार रुपये दिले होते. 14 ऑगस्टला मोहम्मद दिलशाद हा अजरभाईजान या देशात नोकरीसाठी जाण्यासाठी निघाला. मुंबईहून दिल्ली विमानतळावर आल्यानंतर त्याने प्रियांकाला कॉल केला, मात्र तिचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्याने त्याच्या भावाला तिथे जाऊन चौकशी करण्यास सांगितले. मात्र तिथे प्रियांका नव्हती. त्यामुळे तो पुन्हा मुंबईत आला होता.

- Advertisement -

विशेष पथकाने केली अटक

मुंबईत येताच त्याने त्याच्या पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र प्रियांका ही पैसे देण्यास टाळाटाळ करीत होती. त्यामुळे त्याने नागपाडा पोलिसांत तिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी प्रियांकासह इतर आरोपीविरुद्ध फसवणुकीसह इमिग्रेशन कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. चौकशीत प्रियांकाने एक-दोन नव्हे तर तब्बल 156 जणांना विदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 41 लाख रुपये घेतले होते, मात्र त्यापैकी कोणालाही नोकरी दिली नव्हती. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच इतर काही साक्षीदारांनी नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या सर्वांनी प्रियांकाने त्यांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. सुमारे 41 लाख रुपये जमा होताच प्रियांका ही कार्यालयाला टाळे लावून पळून गेली होती, मात्र तिला नागपाडा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -