घरमुंबईदादरच्या जाखादेवीजवळील रुग्णालयाच्या कामाला लवकरच सुरुवात

दादरच्या जाखादेवीजवळील रुग्णालयाच्या कामाला लवकरच सुरुवात

Subscribe

सिध्दीविनायक न्यासासाठी ३७ कोटी रुपये खर्चुन बांधणार मल्टीस्पेशालिटी चिकित्सालय

श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ताब्यात घेतलेल्या दादरच्या जाखादेवी दवाखान्याची जागा पुन्हा महापालिकेने न्यासालाच देत त्यावर महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणारी रुग्णालयाची वास्तू न्यासालाच चालवण्यास देण्याचा करार ऑगस्ट २०१९ केला. त्यानुसार याठिकाणी महापालिकेच्यावतीने मल्टीस्पेशालिटी चिकित्सालय उभारले जात आहे. या चिकित्सालयावर ३७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिकेच्या इतिसाहात बांधकाम होण्याआधीच ती वास्तू एखाद्या संस्थेला देण्याचा करार झाला आहे.

दादर गोखले रोडवरील जाखादेवी मंदिर चौकाशेजारी असलेल्या दवाखान्याच्या जागेवर महापालिकेच्यावतीने तळघर अधिक तळमजला अशा ९ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. एकूण ३२६२ चौरस मीटरचे बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारतीमधील तळ अधिक तीन मजल्यापर्यंतचा वापर महापालिकेचा दवाखाना तसेच आरोग्य केंद्र यासाठी केला जाणार आहे. उर्वरित सर्व मजले श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाला देण्यात येणार आहेत. यामध्ये माता व बाल रुग्णांसह मल्टीस्पेशालिटी उपचारांकरता बाह्यरुग्ण आरोग्य सेवा सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रसुतीगृह व दवाखाना यासाठी आरक्षित असलेला हा भूखंड श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाला भाडेतत्वावर देण्याबाबतचा सामंजस्य करार ऑगस्ट २०१९ मध्ये महापालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या दालनात झाला. पुढील ३० वर्षांकरता या भूखंडावर उभारण्यात येणारी चिकित्सालयाची इमारत भाडेकरारावर देण्यात आली आहे. या करारावर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, न्यासाचे सीईओ प्रियंका कुलकर्णी-छापवाले, तत्कालिन उपायुक्त (आरोग्य) सुनील धामणे, सभागृहनेत्या विशाखा राऊत तसेच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्वाक्षरी केल्या होत्या. जाखादेवी मंदिराजवळ उभारण्यात येणाऱ्या या मल्टीस्पेशालिटी चिकित्सालयाच्या एकूण ४ हजार १४८ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर बांधकाम केले जाणार आहे. यासाठी किंजल सिव्हीलकॉन एल.एल.पी कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला विविध करांसह ३७ कोटी २७ लाख रुपयांना कंत्राट दिले जाणार आहे.

- Advertisement -

न्यासासाठी काहीपण…

तब्बल २० वर्षांपूर्वी गोखले रोडवरील जाखादेवी येथील महापालिका दवाखान्याची जागा न्यासाला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भाडेकरार केल्यानंतरही न्यासाने त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम केले नाही. त्यामुळे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी न्यासाकडून ही जागा ताब्यात घेऊन त्यावर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यासाकडून परत घेतलेली जागा आता पुन्हा एकदा न्यासाच्याच ताब्यात सोपवण्याचा प्रताप प्रशासनाने केला आहे. महापालिकेच्या नियमानुसार मोकळ्या भूखंडावर बांधकाम करून त्याठिकाणी सेवा सुविधा देण्यासाठी खासगी सहभाग तत्वावर खासगी संस्थेची नेमणूक केली जाते. तर जी समाजकल्याण केंद्रे आहेत, ती खासगी संस्थेला चालवायला दिली जातात. परंतु न्यासासाठी महापालिकेचा उलटा फेरा घातला आहे. आधी भूखंडावरील बांधण्यात येणारी  रुग्णालयीन इमारत भाडेकरार संस्थेला नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याचा करार आधीच केला आहे.

“दादरमध्ये श्री सिद्धिविनायक मंदिराचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय व्हावे, ही इच्छा होती. जागा पुन्हा न्यासाच्या ताब्यात घेऊन तिथे सुपरस्पेशालिस्ट रुग्णालयाप्रमाणे आरोग्य सेवा सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याप्रमाणे करार करण्यात आला आहे. यावर महापालिकेच्यावतीने ९ मजली इमारत बांधली जाणार असून लवकरच ही वास्तू बांधून रुग्णांना  सवलतीत आरोग्य सुविधा दिली जाईल.”
– विशाखा राऊत, सभागृहनेत्या, महापालिका

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -