आकाशदर्शन घडवणारे खगोलशास्त्र

Mumbai

अंधार्‍या रात्री लुकलुकणार्‍या तार्‍यांनी भरलेले आकाश पाहायला सर्वांनाच आवडते. लहानांपासून मोठ्यापंर्यंत सर्वांनाच या विश्वाचे कुतूहल वाटल्याशिवाय राहत नाही. बर्‍याचदा या विषयात अभ्यास करून पुढे काम करायची खगोलशास्त्र होण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते. त्यामुळे या संधी कशा व कोठून मिळतील याची माहिती आपण घेऊ या…

मुंबईमध्ये अनेक खगोलशास्त्राशी निगडीत छंद जोपासणार्‍या संस्था आहेत. ज्यांचे सभासद झाल्यावर खगोलशास्त्राशी निगडीत अनेक व्याख्यानांची माहिती तुम्हाला घरपोच मिळते. खगोल मंडळ, आकाश मित्र मंडळ यासारख्या संस्थासोबत तुम्ही आकाशदर्शनाचा आनंद घेऊ शकता. पदवी शिक्षण घेत असताना तुम्ही वरळी येथील नेहरू तारांगण व मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यामाने विशेष खगोलशास्त्राचा एक वर्षीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. यात खगोलशास्त्र विषयातील विविध तज्ज्ञ मागर्र्दर्शन करतात. हा अभ्यासक्रम प्रत्येक रविवारी नेहरू तारांगण येथे चालतो.

आपल्याकडे खगोलशास्त्र या विषयात पदवी शिक्षणाच्या फारशा संधी उपलब्ध नाहीत. खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी विज्ञान विषयातून बारावी व भौतिकशास्त्रातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्यानंतर फार क्वचित ठिकाणी आणि फार कमी जागा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उपलब्ध आहेत. तसेच नेट देऊन तुम्ही संशोधनासाठी पात्र ठरू शकता.

भारतात खगोलशास्त्राचे विशेष अभ्यासक्रम व संशोधनसंधी फार कमी ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे संस्थाच्या स्वत:च्या प्रवेश परीक्षा असतात. या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले असता तुम्ही खगोलशास्त्रातील अभ्यास करून डॉक्टरेट ही पदवी मिळवू शकता. भारतात आयुका, एनसीआरए, टीआयएफआर इत्यादी संस्था खगोलशास्त्र व खगोलभौतिकी या विषयांशी संबंधित संशोधनात अग्रसेर आहेत. या संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

खगोलशास्त्रातील डॉक्टरेट मिळवल्यानंतर भारतात व भारताबाहेरील अनेक देशांमध्ये पुढील शिक्षणाच्या व संशोधनाच्या संधी उपलब्ध होतात. विश्वाची निर्मिती, ग्रह तार्‍यांचा जन्मक्रम, गुरुत्वलहरी, कृष्णविवर यासारख्या अनेक विषयातील कोडी अजूनही आपल्याला माहित नाही. यांच्या अभ्यासाची आणि संशोधनाची संधी तुम्ही मिळवू शकता.

आता काहींना वाटत असेल मला रॉकेट किंवा कृत्रिम उपग्रह यासारख्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तर काय करावे? या विषयासाठी इंडियन इन्टिट्यूट ऑफ स्पेट टेक्नोलॉजी (आयआयएसटी) या संस्थेमध्ये पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. बारावीनंतर तुम्ही या संस्थेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन अभ्यासक्रमाला प्रवेा घेऊ शकता.

मला आंतरविज्ञान आवडते, पण भौतिकशास्त्र किंवा गणित नकोसे वाटते मग माझ्यासाठी काय संधी आहे का?
तुम्ही जीवविज्ञान, रसायनशास्त्र, संगणक, आयटी अशा अनेक क्षेत्रांतून खगोलशास्त्राचा अभ्यास करू शकता. अवकाशातील उल्केमध्ये कोणती खनिजे आहेत याची माहिती रसायनशास्त्रज्ञ देऊ शकतो. तर बाहेरील जगात जीवसृष्टीची चिन्हे शोधण्याचे काम एका जैववैज्ञानिकाला चांगले जमेल. कृत्रिम उपग्रहाकडून येणारे सिग्नल व त्यांचे विश्लेषण एखादा आयटी तज्ज्ञच करू शकेल. केटी बॉमन या संगणक विशेषज्ञ असलेल्या 29 वर्षीय तरुणीने संगणकामध्ये कृष्णविवरांच्या चित्राचा अल्गोरिदम लिहिला. ज्यामुळे कृष्णविवराचे पहिले चित्र सर्व जगास उपलब्ध झाले. कॅटीने आपल्या आवडीचा विषय संगणक व खगोलशास्त्राची योग्य सांगड घातली. संगणक व त्याची रचना एखाद्या संगणक इंजिनियरलाच जमेल. विशिष्ट प्रकारच्या दुबिर्णीची इमारत बांधण्यासाठी रचनाशास्त्र, सिव्हील इंजिनियरींग महत्त्वाचे ठरते.

अंतराळवीर होण्यासाठी काय करावे? यासाठी चांगली व सुदृढ शरीरयष्टी महत्त्वाची ठरते. कारण अवकाशातील विविध प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. आपल्या देशात थेट संधी अजूनतरी उपलब्ध नाहीत. पण भारत लवकरच आकाशात अंतराळवीर पाठवणार आहे. त्यामुळे भविष्यात आपल्या देशातही अंतराळवीर होण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. रॉकेट, अंतराळयान उडवण्यासाठी तुम्हाला वैमानिकाचा अभ्यासक्रम येणे उत्तमच! सध्या अमेरिकेतील नासा संस्थेमध्ये यासंदर्भात कार्यक्रम चालतात. त्याची प्रवेशपरीक्षा ही फारच कठीण असते. सर्वात उत्तम व तत्पर अशा काही व्यक्तींची निवड अंतराळवीर कार्यक्रमासाठी केली जाते.

– शितल चोपडे, सहाय्यक शिक्षणाधिकारी, नेहरू सायन्स सेंटर