मुंबईकर पुन्हा कचाट्यात; बेस्ट कर्मचारी संपाच्या तयारीत!

एकीकडे किमान तिकीट दर ५ रुपयांवर आणून बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांना दिलासा दिला असतानाच आता बेस्ट कर्मचारी संघटनांनी संपाची घोषणा करून मुंबईकरांना पुन्हा एकदा कचाट्यात पकडण्याची तयारी चालवली आहे.

Mumbai
Best will reduce bus fare minimum bus fare 5rs in mumbai
संग्रहित छायाचित्र

अवघ्या आठवड्याभरापूर्वीच बेस्ट प्रशासनाकडून किमान तिकीट मूल्य ५ रुपये करून मुंबईकरांना सुखद धक्का दिला होता. मात्र, मुंबईकरांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही असंच काहीसं चित्र दिस आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात बेस्ट कर्मचारी संघटनांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी संप पुकारला होता. त्यावेळी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तब्बल ९ दिवसांनी हा संप मागे घेतला होता. मात्र, ६ महिने उलटून गेल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्यामुळे बेस्टच्या कर्मचारी संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. येत्या ६ ऑगस्टनंतर कधीही बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे.

प्रशासन-कर्मचारी संघटनांमध्ये करार

७ जानेवारी रोजी बेस्टचे कर्मचारी संपावर गेले होते. प्रकरण थेट उच्च न्यायालयात दाखल झाले. तेव्हा उच्च न्यायालयाने २००७ पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना १० टप्प्यांत वेतनवाढ देण्याची आणि ही वेतनवाढ १ जानेवारी २०१९पासून देण्याचा निर्णय दिला. या प्रकरणी चर्चा करण्यासाठी निवृत्त मुख्य न्यायाधीश एफ. आय. रिबेलो यांची मध्यस्थ म्हणून नियुक्तीही करण्यात आली. मात्र, ही चर्चा अपयशी ठरली. ११ जून रोजी पुन्हा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि महापालिकेने घेतलेली बेस्टची जबाबदारी या निमित्ताने चर्चा झाली आणि आयुक्तांच्या पुढाकाराने बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.


हेही वाचा – मुंबईकरांना बेस्टचे गिफ्ट; तिकीट झाले स्वस्त!

प्रशासनाकडून कराराचं पालन नाहीच

दरम्यान, या करारामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात तातडीने पावलं उचलण्यात येतील असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार कर्मचारी संघटनांकडून बेस्ट प्रशासनाला ८ जुलै रोजी पहिल्यांदा याची आठवण करून देणारे पत्र पाठवण्यात आले. त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे पुन्हा ४ वेळा आठवण करून देण्यात आली. मात्र, तरीदेखील कार्यवाही न झाल्यामुळे अखेर कर्मचारी संघटनांनी पुन्हा संपाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत महापालिका आणि बेस्ट उपक्रमाने तातडीने हालचाली करुन शांततामय पद्धतीने निर्णय द्यावा. अन्यथा ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर कधीही बेस्ट कर्मचारी संपावर जातील.

शशांक राव, सरचिटणीस, बेस्ट वर्कर्स युनियन