नगरसेवकांनी केली महिलांना ऑटो रिक्षाचे प्रशिक्षण देण्याची मागणी

bmc
मुंबई महानगर पालिका

मुंबईतील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून होत आहे. मात्र, अनेक महिला आता स्वत: रिक्षा तसेच खासगी वाहने चालवू लागली आहेत. त्यामुळे त्यांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीकोनातून रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे या माध्यमातून त्या वाहन चालकांना परवाना आणि बिल्ला मिळवण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याची मागणी नगरसेवकांच्या माध्यमातून होत आहे.

बचत गटांना मोठे करण्यात महिलांचा मोठा वाटा असून महिला आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेन वाटचाल करत आहेत. स्वावलंबी, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वत:च्या पायावर उभी राहिलेली स्त्री ही खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक विकासातील योगदानाची साक्ष ठरते. मुंबई महापालिकेच्या जेंडर बजेट अंतर्गत महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी घरघंटी, शिलाई मशिन अशा प्रकारे गृहोत्पादनांची साधने उपलब्ध करून देते.

आज महिला पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रांमध्ये सक्षमपणे कार्यरत आहेत. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगारासाठी गृहोत्पादनांच्या साधनांचे वाटप करण्याबरोबर वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करणे ही काळाची गरज असल्याचे भाजप नगरसेविका जागृती पाटील यांनी स्पष्ट करत महिलांना ऑटो रिक्षा प्रशिक्षण तसेच त्या वाहन चालकांना परवाना व बिल्ला मिळवण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.