घरCORONA UPDATEमुंबईत महापालिकेच्याच शाळेने केला श्रीगणेशा!

मुंबईत महापालिकेच्याच शाळेने केला श्रीगणेशा!

Subscribe

सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून मुंबई महापालिकेकडून झोपडपट्टी परिसरत असलेल्या शिवाजी नगरमध्ये 6 जुलैपासून शाळा सुरू करण्यात आली आहे. शिवाजी नगर उर्दू शाळा क्रमांक 8 मध्ये सकाळच्या सत्रात सातवी इयत्तेचे वर्ग भरले जात आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करण्याबाबत अनिश्चितता आहे. असे असतानाही सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून मुंबई महापालिकेकडून झोपडपट्टी परिसरत असलेल्या शिवाजी नगरमध्ये ६ जुलैपासून शाळा सुरू करण्यात आली आहे. शिवाजी नगर उर्दू शाळा क्रमांक ८ मध्ये सकाळच्या सत्रात सातवी इयत्तेचे वर्ग भरले जात आहेत. मानखुर्द-शिवाजी नगर परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडत असताना ही शाळा सुरू करून पालिकेने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालवला असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांमधून उमटत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचे सर्व निर्णय शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनाकडे दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना धान्य आणि पुस्तके वाटप करण्यासाठी शिक्षकांना आठवड्यातून दोन दिवस शाळेत येण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही स्थानिक प्रशासनाने अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु नुकतेच पालिका प्रशासनाने शाळेतील शिक्षकांना ६ जुलैपासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. या पार्श्वभूमीवर विभाग निरीक्षकांनी ६ जुलैपासून शिवाजी नगर उर्दू शाळा क्रमांक ८ सुरू करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या. त्यानुसार मुख्याध्यापकांनी शाळा सुरू केली असून, दररोज सकाळच्या सत्रामध्ये सातवीचे वर्ग भरत आहेत. शाळेमध्ये दररोज किमान १५ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. शाळेत उपस्थित राहणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नाही. तर सॅनिटायझरचीही काही व्यवस्था करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे शाळा सुरू करणे हे धोकादायक आहे. त्यातच मानखुर्द-शिवाजी नगर या झोपडपट्टी परिसरात कोरोना रुग्ण सापडत असताना विद्यार्थ्यांना दररोज शाळेत बोलवून त्यांचा जीव मुख्याध्यापकांकडून धोक्यात घातला जात असल्याने पालक व शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

शिक्षण विभागाने आठवड्यातून दोन दिवस शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले असतानाही विभाग निरीक्षकांकडून शिक्षकांना दररोज उपस्थित राहण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे. तसेच उपस्थित न राहिल्यास त्यांच्या सर्व्हिस बुकामध्ये रेड मार्क करण्यात येईल, अशी धमकीही देण्यात येत असल्याची माहिती काही शिक्षकांनी दिली. पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात कोणतेच आदेश दिले नसतानाही प्रशासकीय अधिकारी, विभाग निरीक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून मनमानी कारभार चालवत शाळा सुरू करण्यात आली असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेचे अध्यक्ष के.पी. नाईक यांनी केली आहे.

शाळा सुरू झाल्याची माहिती चुकीची आहे. मुंबईमध्ये एकही शाळा सुरू झालेली नाही. शाळेत पुस्तके नेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वर्कशीट कशी भरायची याची माहिती शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली.
– महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका

शिक्षक, मुख्याध्यापक यांनी सरकारचे व मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाचे सर्व नियम धुडकावून विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून वर्ग सुरू केले आहेत. या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची जबाबदारी शिक्षणाधिकार्‍यांची असेल. बेजबाबदारपणे वागणार्‍या प्रशासकीय अधिकारी, विभाग निरीक्षक, मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी.
– के.पी.नाईक, अध्यक्ष, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सेना

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -