घरक्राइमदादरमध्ये प्रेयसीवर भरस्त्यात चाकूने हल्ला करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

दादरमध्ये प्रेयसीवर भरस्त्यात चाकूने हल्ला करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

दादरच्या आगार बाजार या ठिकाणी भर रस्त्यात २८ वर्षीय प्रियकराने २५ वर्षीय प्रेयसीवर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःवर देखील चाकूने वार करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात जखमी दोघांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात जखमी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी दिली.

दादर परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय मनीषा (काल्पनिक नाव) हिचे त्याच परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय मनोज सोबत मागील चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते. मनीषा ही एका खाजगी कंपनीत टेली कॉलर म्हणून नोकरी करते, तर मनोज हा टॅक्सी चालक आहे. मागील काही महिन्यांपासून मनोजला दारूचे व्यसन जडल्यामुळे तो दारूच्या नशेत मनीषाला त्रास देत होता. त्याच्या या वागण्यामुळे मनीषा त्याला कंटाळली होती. तीने मनोज सोबतचे प्रेमसंबंध तोडण्याच्या ठरवले आणि मागील दोन महिन्यांपासून ती त्याला टाळू लागली होती. यामुळे मनोज संतापला होता. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या सोबत प्रेमप्रकरण सुरु आहे कि काय असा संशय त्याच्या मनात आला आणि त्याने तिला संपवण्याचे ठरवले.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मनोजने मनीषाला भेटण्यासाठी दादर येथील आगर बाजार रोडवर बोलावले. मनीषा त्याला भेटायला येताच त्याने आगर बाजार रोडवरच मनीषावर चाकूने हल्ला करून तेथून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषाला घटनास्थळी दाखल झालेल्या दादर पोलिसांनी परळच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी आरोपी मनोज याचा शोध सुरु केला असता तो जखमी अवस्थेत कीर्ती महाविद्यालयाजवळ सापडला. पोलिसांनी त्याला ताबडतोब उपचारांसाठी सायन रुग्णलायत दाखल केले. प्रेयसीवर चाकूने हल्ला करून पकडले जाण्याच्या भीतीने त्याने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली.

दादर पोलीस ठाण्यात मनोज विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याची प्रकृती सुधारताच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -