आता मध्यवर्ती खरेदी विभागावर सी.सी.टिव्हीचा वॉच

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह दवाखाने आणि प्रसुतीगृहांसाठींच्या औषध खरेदी प्रकरणात कंत्राटदारांवर कारवाई केल्यानंतर आता मध्यवर्ती खरेदी विभागावर सी.सी.टिव्हीचा वॉच राहणार आहे.

Mumbai
bmc health department new concept start for diabetes patient
मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह दवाखाने आणि प्रसुतीगृहांसाठींच्या औषध खरेदी प्रकरणात कंत्राटदारांवर कारवाई केल्यानंतर आता मध्यवर्ती खरेदी विभागावर सी.सी.टिव्हीचा वॉच राहणार आहे. तर मध्यवर्ती खरेदी विभागातील कंत्राटदारांचा हस्तक्षेप रोखावा याकरता अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी मध्यवर्ती खरेदी विभागातच (सीपीडी) हे कॅमेरे बसवले आहेत. तसेच औषध खरेदीची प्रक्रीया राबवणार्‍या प्रकाश महाले यांची बदली देखील केली आहे. महाले हे मागील अनेक वर्षांपासून याच विभागात असल्याने त्यांची मक्तेदार मोडीत काढतानाच जोशी यांनी या खात्याच्या कार्यालयांमध्ये सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवून अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांनी चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, दवाखाने तसेच प्रसुतीगृहांसाठी मध्यवर्ती खरेदी विभागामार्फत अनुसुचीवरील औषधांची खरेदी केली जाते. खरेदी केलेली ही औषधे महापालिका रुग्णालयातील रुग्णांना मोफत दिली जातात. परंतु, महापालिकेने कंत्राटदारांची नेमणूक केल्यानंतरही अनेक कंपन्यांकडून ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये औषधांचा पुरवठा केलेला नाही. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणून याचा फटका रुग्णांना बसला होता. त्यानंतर विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षांनीही बोंबबोंब ठोकण्यास सुरुवात केल्यानंतर औषधांचा पुरवठा करणार्‍या कंपन्यांविरोधात कारवाईची मोहिम राबवण्यात आली. त्यानंतर दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते.

कामकाजावर प्रशासनाचे लक्ष

मात्र, औषधांची खरेदी केल्या जाणार्‍या मध्यवर्ती खरेदी खात्यातील अधिकारी आणि कंत्राटदारांची मिलिभगत असल्याने तसेच कंत्राटदारांना पाठिशी घालण्याचे काम करून कारवाई न करणार्‍या अधिकार्‍यांना मागील दहा दिवसांपूर्वी पदावरुन बाजुला करण्यात आले. आरोग्य विभागाचे अधिकारी असलेल्या प्रकाश महाले यांनी दहा दिवसांपूर्वी झालेल्या औषधाच्या निविदेच्या बैठकीत समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांची बदली केईएम रुग्णालयात केली आहे. त्यामुळे या मध्यवर्ती खरेदी खात्यातील कंत्राटदारांच्या हस्तक्षेपाचा मार्गच अतिरिक्त आयुक्तांनी बंद करून टाकल्याने कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मध्यवर्ती खरेदी खात्याच्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांचा हस्तक्षेप होत असल्याने महापालिकेच्यावतीने या कार्यालयांमध्ये सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवणयात आले आहे. तसेच उपायुक्तांच्या कार्यालयातही अशाप्रकारे सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या सी.सी.टिव्ही कॅमेरांमुळे सीपीडीमध्ये कोणते कंत्राटदार येतात आणि कोणाला भेटतात यावर खुद्द अतिरिक्त आयुक्तच लक्ष ठेवणार असल्याचे माहिती मिळत आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा देत सीपीडीच्या कार्यालयांमध्ये सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचे म्हटले. तर गेल्या अनेक वर्षांपासून सीपीडीमध्ये असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकार्‍याची बदली करण्यात आली आहे. ही प्रक्रीया कामकाजाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – ‘…तर शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदही सोडलं असतं!’


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here