घरमुंबईऐन गणेशोत्सवात परीक्षा, मुंबईतील कॉन्व्हेंट शाळांचा प्रताप

ऐन गणेशोत्सवात परीक्षा, मुंबईतील कॉन्व्हेंट शाळांचा प्रताप

Subscribe

पालकांमध्ये नाराजी पसरली असून या शाळांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याविरोधात आता युवा सेनेने देखील दंड थोपटले असून कारवाईच्या मागणीसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे धाव घेतली आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून या उत्सवादरम्यान शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय सरकारतर्फे जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला न जुमानता मुंबईतील काही कॉन्व्हेंट शाळांनी सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर मुंबईतील काही कॉन्व्हेंट शाळांनी या काळात चक्क विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा प्रताप केला आहे. यामुळे पालकांमध्ये नाराजी पसरली असून या शाळांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याविरोधात आता युवा सेनेने देखील दंड थोपटले असून कारवाईच्या मागणीसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे धाव घेतली आहे.

- Advertisement -

मुंबईसह राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान घरगुती गणेशोत्सवाचे प्रमाण ही गेल्या काही दिवसांपासून वाढत असून या उत्सव कालावधीत शाळांना पाच दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने जीआर देखील जाहीर केला असून या काळात सुट्टी जाहीर करताना शाळांनी परीक्षा घेऊ नये, असे आदेश दिले आहेत.

यामुळे शहरातील शाळा उत्सवादरम्यान किमान ५ दिवस तरी बंद ठेवण्यात येतात. मुंबईतील बहुतांश विद्यार्थी या दरम्यान आपल्या गावी जातात. परंतु तरीही दादर येथील कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कुल ही शाळा केवळ सुरूच ठेवण्यात आली नव्हती तर तेथे पुस्तकी परीक्षा घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी हा सर्व प्रकार समोर आणला आहे. मुळात उत्सव काळात परीक्षा घेऊ नये अशा सूचना असतानाही खासगी किंवा कॉन्व्हेंट शाळा परीक्षा घेण्यास धजावतातच कशा ? असा सवाल प्रदीप सावंत यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

शाळांना किती सुट्टी द्यायची याची मुभा शाळांना असली तरी विद्यार्थी व पालकांचा विचार शाळांनी करायला हवा. परीक्षा तर घ्यायलाच नकोत त्यामुळे शासन आदेश धुडकावून लावणार्‍या अशा शाळांविरोधात शासनाच्या शिक्षण विभागाने कडक कारवाई केली तरच या शाळा पुढच्या वेळी विद्यार्थी आणि पालकांना असा मनस्ताप देणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आम्ही पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याकडे देखील तक्रार केली असून याप्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. – प्रदीप सावंत, मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -