Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई धनंजय मुंडेंकडून सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट

धनंजय मुंडेंकडून सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट

Related Story

- Advertisement -

गायिका रेणू शर्मा यांनी राज्याचे सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी स्वत:हून मंगळवारी त्याबद्दल खुलासा केला. त्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण तप्त झाले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर स्वत: मुंंंडे यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत चर्चा करून त्यांना आपली बाजू सविस्तर समजावून सांगितली.

धनंजय मुंडे यांनी बुधवारी सकाळी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. या बैठकीला धनंजय मुंडेही उपस्थित होते. मुंडे यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार- धनंजय मुंडे यांच्यात अनेक मिनिटे गुफ्तगू झाले. धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांची सविस्तर भूमिका पवारांसमोर मांडल्याचे समजते. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या.
धनंजय मुंडे यांच्याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यातील जी कायदेशीर बाब आहे, ती धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचे सांगितले आहे. असे संशयाचे वातावरण राहणे योग्य नाही. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या संदर्भातील सत्य बाहेर आणावे. पोलिसांनी एकदा सत्य बाहेर आले की, आम्ही आमची मागणी करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंडे यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाकडे तक्रार

मंत्री धनंजय मुंडे यांची भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना ऑक्टोबर २०१९मध्ये आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या दोन पत्नींची तसेच सर्व मुलांची माहिती आणि त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती लपवली होती. त्यामुळे माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, अशी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली.


- Advertisement -

 

- Advertisement -