घरताज्या घडामोडीआयर्लंडवरुन कॉल, दिल्ली पोलिसांची टीप आणि मुंबई पोलिसांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या युवकाचे...

आयर्लंडवरुन कॉल, दिल्ली पोलिसांची टीप आणि मुंबई पोलिसांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या युवकाचे प्राण

Subscribe

सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांवर कितीही आरोप-प्रत्यारोप होत असले तरी मुंबई पोलीस हे आंतरराष्ट्रीय स्तरावर का नावाजलेले आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. शनिवारी दिल्लीतील एक तरुण मुंबईत आत्महत्या करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. काही तासांतच पोलिसांनी या युवकाला शोधून त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. ही साधी सोपी केस वाटत असली तरी हे प्रकरण थरारक असेच म्हणावे लागेल. मुंबईतील तरुण आत्महत्या करणार असल्याची माहिती आयर्लंडवरुन फेसबुक अधिकाऱ्याने दिल्ली पोलिसांना दिली. दिल्ली पोलिसांनी ही माहिती मुबंई पोलिसांकडे पाठवली. मुंबई सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी स्वतः या प्रकरणात तपास करुन या तरुणाचे प्राण वाचविले.

काय आहे प्रकरण?

शनिवारी संध्याकाळी ७.५१ वाजता दिल्ली पोलिसांना आयर्लंडवरुन फेसबुक अधिकाऱ्याचा फोन आला. फेसबुकवर एक तरुण आत्महत्या करणार असल्याची पोस्ट टाकत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांना त्या व्यक्तिचा फोन नंबरही फेसबुक अधिकाऱ्याने दिला. दिल्ली पोलीस सायबर सेलचे उपायुक्त अन्येश रॉय यांनी तात्काळ त्या तरुणाचा दिल्लीतील पत्ता मिळवून त्याचे घर गाठले. मात्र तिथे गेल्यावर कळले की, तो नंबर एका महिलेचा असून त्या फोन नंबरवर तिच्या पतीने फेसबुक अकाऊंट उघडलेले आहे. हे अकाऊंट पतीच चालवतो.

- Advertisement -

पत्नीशी झालेल्या वादातून आत्महत्येचा निर्णय

दिल्ली पोलिसांनी सखोल चौकशी केली असता पत्नीने खरी माहिती दिली. १४ दिवसांपूर्वी पती-पत्नीचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग डोक्यात ठेवून पती मुंबईत निघून गेला होता. मात्र तेव्हापासून मानसिक तणावात असल्यामुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. याबाबत त्याने फेसबुकवर पोस्ट टाकल्या होत्या. ज्या आयर्लंडमधील फेसबुक अधिकाऱ्याच्या निदर्शनास आल्या.

मुंबई पोलिसांची डोकॅलिटी

दिल्ली पोलिसांनी तात्काळ मुंबई पोलिसांना याची टिप दिली. मात्र मुंबई पोलिसांकडेही फार काही माहिती नव्हती. त्या युवकाचा फोन नंबर आणि तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करतो एवढीच माहिती मिळाली होती. या तुटपुंज्या माहितीवर मुंबई सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी तपासाला सुरुवात केली. पहिल्यांदा त्या तरुणाला फोन करुन करंदीकर यांनी त्याचे समुपदेशन सुरु केले. तर दुसऱ्या बाजुला पोलिसांच्या एका टीमने त्या युवकाचा पत्ता शोधून त्याचे घर गाठले. करंदीकर यांनी त्या युवकाला बोलण्यात गुंतवून ठेवल्यामुळे मिळालेल्या वेळात पोलिसांची टीम घरी पोहोचली.

- Advertisement -

मुंबई सायबर सेलने दाखविलेल्या समयसुचकता आणि दिल्ली पोलिसांनी वेळेवर दिलेल्या माहितीमुळे या तरुणाचे प्राण वाचले. त्यानंतर दिल्लीतील त्याच्या पत्नीने मुंबई पोलिसांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -