होमिओपॅथी डॉक्टरांच्या चिठ्ठीवर आता अॅलोपॅथी औषधं मिळणार नाहीत

होमिओपॅथी डॉक्टरांच्या चिठ्ठीवर अॅलोपॅथी औषधं देणाऱ्या केमिस्टवर एफडीएकडून कारवाई केली जाणार आहे. ‘ऑल फूड अँण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशन’ ने एफडीएच्या औषध विभागाला पत्र पाठवून अशा केमिस्टवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार एफडीएने ही विनंती मान्य केली आहे.

Mumbai
FDA will action against medicin vendors sellling medicines without doctors reference
औषध

होमिओपॅथी डॉक्टरांच्या चिठ्ठीवर आता अॅलोपॅथी औषधं मिळू शकणार नाहीत. शिवाय, जर केमिस्टमधील विक्रेत्याने अशी औषधं उपलब्ध करुन दिली तर त्या केमिस्टवर एफडीएकडून कारवाई केली जाणार आहे. ‘ऑल फूड अँण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशन’ने एफडीएला पत्र पाठवून अशा केमिस्टवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, हा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यांचा ब्रीजकोर्स केल्यानंतर ‘होमिओपॅथी’ डॉक्टरांना ‘अॅलोपॅथी’ची प्रॅक्टिस करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. पण औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार, ‘होमिओपॅथी’ डॉक्टरांना ‘अॅलोपॅथी’ औषधांची खरेदी किंवा साठा करण्यासही परवानगी नाही.

एफडीएने घेतली दखल

होमिओपॅथी डॉक्टर सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण केल्यानंतरच रुग्णांना अॅलोपॅथी औषधं लिहून देऊ शकतात. पण, याआधीच काही डॉक्टर त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना अॅलोपॅथी लिहून देत असल्याचं समोर आलं होतं. होमिओपॅथी डॉक्टरांनी चिठ्ठीवर अॅलोपॅथी औषधं दिलेली असल्याचं माहित असूनही औषध विकणाऱ्या केमिस्टवर मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. यासाठीच ‘ऑल फूड अँण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशन’ ने एफडीएच्या औषध विभागाला पत्र पाठवून अशा केमिस्टवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार एफडीएने ही विनंती मान्य केली आहे.

बीजकोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांनाच सरकारने अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिली आहे. पण, अजून बीजकोर्सची एकही बॅच शिक्षण घेऊन बाहेर पडलेली नाही. तरीही होमिओपॅथी डॉक्टर रुग्णांना अॅलोपॅथी औषध लिहून देतात आणि या चिठ्ठीवर अनेक औषध विक्रेते रुग्णांना औषधं देतात. औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० नुसार हा गुन्हा आहे. त्यामुळे, या किरकोळ औषध विक्रेत्यांवर कारवाई करा शिवाय त्यांचा परवाना निलंबित करा अशी मागणी ‘एफडीए’कडे केली होती. ही मागणी आता एफडीएने मान्य केली आहे.
– अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अँण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशन

एफडीएने या मागणीची दखल घेतली असून होमिओपॅथी डॉक्टरांनी अॅलोपॅथी औषध चिठ्ठीवर लिहून दिल्यानंतर ग्राहकांना ही औषध देणाऱ्या केमिस्टवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. एफडीएच्या औषध विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

डॉक्टरांच्या चिठ्ठीवर औषधांची विक्री करणं आणि डॉक्टरांनी स्वतः औषधांचा साठा करून रुग्णांना विकणं या दोन्ही विभिन्न गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे होमिओपॅथी डॉक्टर अॅलोपॅथीचा साठा बाळगत असल्याप्रकरणी वारंवार त्यांच्यावर कारवाई झाली आहे. पण, होमिओपॅथी डॉक्टर चिठ्ठीत अॅलोपॅथी लिहून देत असतील आणि औषध विक्रेतांना हे माहिती असून ते ग्राहकांना ही औषध विकत असतील तर अशा विक्रेत्यांची माहिती एफडीएला द्यावी. त्यानुसार तपास करून संबंधित औषध विक्रेत्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल.
– अमृत निखाडे, एफडीएच्या औषध विभागाचे सह-आयुक्त