घरमुंबईगणेश मंडळांना अन्न सुरक्षिततेचं प्रशिक्षण!

गणेश मंडळांना अन्न सुरक्षिततेचं प्रशिक्षण!

Subscribe

मुंबई, ठाणे, अमरावती, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या ७ विभागांमधील गणेश मंडळांना, एफडीएकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील गणेशभक्तांना लाडक्या गणपतीच्या आगमनाचे वेध लागले आहेत. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात मिठाईंमध्ये भेसळ होण्याची भीती देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अशा भेसळीवर निर्बंध घालण्यासाठी ‘एफडीएने’ (फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन) दरवर्षीप्रमाणे यंदाही पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईसह अनेक राज्यात गणपती मंडळांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत यंदाच्या वर्षी केवळ मिठाई विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करण्याशिवाय गणपती मंडळांना सुरक्षा आणि स्वच्छता कशाप्रकारे राखावी ? याबाबत प्रशिक्षणही दिलं जात आहे. मोठ्या मंडळात सुरक्षित अन्न वितरीत करण्याबाबत प्राधिकरणाने गेल्यावर्षी प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन देत एक उपक्रम सुरू केला होता. त्यानुसार यावर्षी हा उपक्रम राबवला जात आहे.

७ विभागातील गणपती मंडळांना प्रशिक्षण

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ७ एफडीएच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागानुसार मंडळाकडे जाण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, अमरावती, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या विभागांचा समावेश आहे. या ७ प्रमुख विभागातील अधिकाऱ्यांना तिकडे जाऊन इन्स्पेक्शन करायचं आहे. याविषयी अधिक माहिती देताना अन्न सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी सांगितले की, “प्रसाद म्हणून भेसळ नसलेलेच पदार्थ वाटले जावेत याच उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे. गेल्यावर्षी, मिठाई आणि अन्य गोड पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत गणपती मंडळाच्या जवळ असणारे मिठाई विक्रेते आणि मंडळातील सदस्य यांचा समावेश होता. या कार्यशाळेत गणपती मंडळांना सुरक्षेच्या आणि अन्न स्वच्छतेच्या उपाययोजनांची जाणीव करुन देण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

- Advertisement -

दरवर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी केले जातात. उत्सवादरम्यान एफडीएचे अधिकारी भेसळ होऊ नये म्हणून विविध विक्रेत्यांकडून मिठाईचे नमुने गोळा करतात. तेल, तूप, मावा यांसारख्या कच्च्या पदार्थांचा मिठाईमध्ये वापर कशापद्धतीने पदार्थांमध्ये केला जातो ? हे अनेकदा अचानक दिलेल्या भेटीत उघड होतं. याशिवाय, सणादरम्यान सरप्राईज भेटी आयोजित केल्या जातात. सावधगिरीच्या उपाययोजनांसाठी आम्ही मंडळांना सोबत घेऊन काम करतो. उत्सवाच्या दरम्यान नियमित तपासणीही केली जाणार आहे. – असं चंद्रशेखर साळुंके, अन्न सहआयुक्त

उपक्रमाचे सलग दुसरे वर्ष

गेल्यावर्षी गणपती उत्सवाच्या काळात एफडीए आणि एफएसएसएआय म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने अशाच प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत ७० गणपती मंडळ आणि अन्न विक्रेते उपस्थित होते. लालबाग, भायखळा, चेंबूर, बोरिवली, भांडुप आणि दादर या मंडळांचा समावेश होता. त्यावेळेस एफडीएने नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या अन्न भेसळविषयीच्या तक्रारींचीही नोंद केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -